नकारात्मक उर्जेचा नाश करण्यासाठी या वस्तू करा दूर


पुरातन काळापासून आपल्याकडे अनेक पद्धती किंवा रूढी परंपरागत चालत आल्या आहेत, ज्यांचा अवलंब आज ही, घरामधील वातावारण आनंदी, सकारात्मक राहावे, घरामध्ये सुबत्ता आणि आरोग्य नांदावे, या करिता आपण करत असतो. या पद्धती किंवा रूढी घरामधील निरनिराळ्या वस्तूंशी किंवा कार्यांशी निगडीत आहेत. प्रत्येक घरामध्ये कुठली ना कुठली मोडकी वस्तू हमखास असतेच, तसेच अश्याही काही वस्तू असतात ज्यांचा काहीही उपयोग नसतो आणि तरीही त्या घरातच कुठेतरी कोपऱ्यात किंवा माळ्यावर पडून असतात. वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू जर तुटक्या, मोडक्या स्थितीत आपल्या घरामध्ये पडलेल्या असतील, तर त्या वस्तूंच्या द्वारे घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करू शकते. नकारात्मक उर्जा घरामध्ये असल्यास घरातील वातावरण तणावपूर्ण राहणे, आर्थिक समस्या, घरातील सदस्यांची आजारपणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही वस्तू मोडलेल्या किंवा नादुरुस्त स्थितीमध्ये घरामध्ये ठेऊ नयेत.

पुष्कळ लोक आपल्या घरामध्ये मोडकी भांडी ठेवतात. पुढे कधी तरी याचे काही तरी करू, किंवा कोणाला तरी देऊन टाकू असा विचार करून ती भांडी घरातच किती तरी दिवस पडून राहतात. त्यामुळे घरामध्ये कुठल्याही प्रकारची मोडकी भांडीकुंडी असल्यास त्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी. त्यामुळे घरातील अडगळ कमी होईलच, शिवाय नकारात्मक उर्जाही नष्ट होईल. मोडक्या भांड्यांच्या प्रमाणेच मोडका किंवा भंगलेला आरसाही घरामध्ये ठेऊ नये. तुटलेला किंवा भंगलेला आरसा हा एक मोठा वास्तुदोष मानला गेला आहे. यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जा सक्रीय होऊन घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

याचप्रमाणे, मोडके, निकामी झालेले घड्याळ ही घरामध्ये ठेऊ नये. असे म्हणतात की कुठल्याही परिवाराची उन्नती त्या त्या ठराविक वेळेवर अवलंबून असते. त्यामुळे वेळ दाखविणारे यंत्र, म्हणजेच घड्याळ नेहमी चालू स्थितीत असावे. तसेच घरामध्ये तुटलेले फर्निचर, फोटोफ्रेम या ही ठेऊ नयेत. घराच्या कुठल्याही दरवाजाची कुठल्या कारणाने मोडतोड झाली असल्यास, आवश्यक ती दुरुस्ती करून दरवाजा ठीक करून घ्यावा. या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब केल्याने घरामध्ये सकारात्मक उर्जा सक्रीय राहण्यास मदत होते.

Leave a Comment