उच्च शिक्षणाची दुरवस्था


आपल्या देशामध्ये शिक्षणाचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे आणि सहा वर्षे पूर्ण केलेली काही थोडी मुले आणि मुली वगळता बहुतेक मुले शाळांमध्ये दाखल होत आहेत. मात्र शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी उच्च शिक्षण पुरे करतात याचा छडा लावला असता फार निराशाजनक चित्र समोर येते. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याने दिलेल्या माहितीनुसार शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ १२ विद्यार्थीच पदवी परीक्षेपर्यंत मजल मारतात. उर्वरित ८८ विद्यार्थी शिक्षणाच्या विविध स्तरांवर गळती होतात. काही विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याच्या आतच घरी बसतात तर काही विद्यार्थी जेमतेम दहावीपर्यंत शिकू शकतात. बारावीपर्यंत जाणार्‍यांची संख्या तर अजून कमी होते आणि फक्त बाराजण पदवी प्राप्त करतात.

विकसित देशाच्या तुलनेत विचार केला असता हे प्रमाण फार दयनीय आहे. कारण यूरोप खंडातील काही प्रगत देशातील उच्च शिक्षणाचे आकडे उपलब्ध आहेत आणि त्या देशांमध्ये प्राथमिक शाळेत प्रवेश घेतलेल्या १०० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८० विद्यार्थी पदवीपर्यंत पोहोचतात. म्हणजे त्या देशांमध्ये गळतीचे प्रमाण केवळ २० टक्के एवढे आहे जे भारतात ८८ टक्के आहे. पदवीपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती का होत असावी याचा अंदाज घेण्यासाठी कर्नाटक सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने राज्यामध्ये काही जिल्ह्यांचे सर्वेक्षण केले. तेव्हा असे लक्षात आले की कर्नाटकामध्ये आणि त्यातल्या त्या उत्तर कर्नाटकामध्ये उच्च शिक्षणाची अवस्था फार वाईट आहे.

पहाणीमध्ये आढळलेल्या चित्रानुसार कर्नाटकात २५ हजार खेडी आहेत आणि त्यातील २००० खेड्यांमध्ये आजपर्यंत एकही व्यक्ती पदवीधर झालेली नाही. ज्या गावांमध्ये अशी अवस्था आहे त्या गावांची संख्या कोलार जिल्ह्यात सर्वाधिक आहे. या जिल्ह्यातल्या २१२ खेड्यांमध्ये एकही व्यक्ती अद्याप पदवीधर नाही. म्हणजे शिक्षणात हा जिल्हा सर्वात मागे आहे. तुमकूर आणि उत्तर कन्नडा या दोन जिल्ह्यातही अशीच अवस्था आहे. या गावामध्ये शिक्षणाची अवस्था वाईट असल्यामुळे असे घडल्याचे मानले जात असले तरीही या पाहणीला आणखी एक बाजू आहे. जिच्यामुळे थोडासा दिलासा मिळतो. या गावातले काही लोक पदवीधर आहेत परंतु त्यांनी पदवीच्या शिक्षणासाठी आपले गाव सोडून मोठ्या शहरात वास्तव्य केलेले आहे. त्यामुळे गावातल्या पाहणीत एकही पदवीधर दिसत नाही. प्रत्यक्षात या गावातले काही लोक पदवीधर आहेत आणि ते शहरात राहत आहेत.

Leave a Comment