फलाहाराचे फायदे


निरनिराळ्या प्रकारची फळे खाल्ल्याने ती खाणार्‍यांचे आरोग्य सुधारते आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते कारण फळे ही जीवनसत्त्वे, पोषणमूल्ये, फायबर आणि ऍण्टीऑक्सिडंटस् यांचे साठे असतात. मात्र प्रत्येक फळाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. ते समजून घेऊन आरोग्यासाठी प्राधान्याने कोणती फळे खावीत हे ठरवता आले पाहिजे. सफरचंद हे त्यातील सर्वाधिक फलदायी फळ असून त्याच्या बाबतीत सांगितली जाणारी, ऍपल अ डे, डॉक्टर अवे हे उक्ती खरीच आहे. कारण सफरचंद हे कर्करोग प्रतिबंधक मानले जाते. सफरचंदामध्ये उपलब्ध असलेले फ्लेवोनाईटस् हे आपले अस्थमा, मधूमेह यापासून संरक्षण करत असते. शिवाय सफरचंद खाल्ल्याने बुध्दीचाही विकास होतो.

संत्रा हेसुध्दा सर्वाधिक लोकप्रिय मानले जाणारे फळ आहे आणि ते सर्वाधिक पोषक आहे. संत्रामधून क जीवनसत्त्व, पोटॅशियम आणि ब जीवनसत्त्व विपुल प्रमाणात मिळत असते. थायमाईन आणि फोलेट या दोन द्रव्यांचा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास चांगलाच उपयोग होत असतो. संत्र्यामध्ये सिट्रीक ऍसिड असते. आपण खात असलेल्या अन्नातील लोहाचे योग्य त्या प्रमाणात शोषण करून ते आपल्या रक्त वाहिन्यांमध्ये मिसळवण्यास सिट्रीक ऍसिड उपयोगी पडत असते आणि त्यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. केळी हे फळ तर फळांचा राजा म्हणवले जाते कारण त्यातून पोटॅशियम, स्टार्च आणि पेक्टिम हे उपलब्ध होते. कार्बोहायड्रेटस् मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे केळी खाणार्‍यांची कार्यशक्ती चांगली राहते. केळीतील स्टार्चच्या प्रमाणामुळे ब्लडशुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पायनॅपल म्हणजेच अननस हेसुध्दा बहुगुणी फळ आहे. ते दाह प्रतिबंधक मानले जाते. हे फळ खाल्ल्याने हृदयविकाराची शक्यता कमी होते. संधीवात असणार्‍यांनी हे फळ खावे कारण संधीवातावर ते गुणकारी आहे. पायनॅपल हे क जीवनसत्त्वांनी युक्त आहे आणि त्यातील ब्रोमेलेनमुळे सर्दी आणि पडसे कमी होते. हे फळ मँगनीजयुक्त असल्यामुळे त्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. पायनॅपलचा एक कपभर ज्यूस प्यायल्याने मँगनीज मोठ्या प्रमाणावर मिळते. शिवाय पायनॅपल हे मुखरोगावरही उपयुक्त आहे. अशाच रितीने किवी आणि चेरी ही दोन फळेही अनेक पोषण द्रव्यांनी युक्त असून त्यांच्या सेवनाने अनेक लाभ होत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment