W. Bengal : ममता सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक, ईडीने जवळच्या मित्राच्या घरातून जप्त केले 20 कोटी रुपये


कोलकाता: अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक दिवसापूर्वी, त्याची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या घरावरही ईडीने छापा टाकला होता. या छाप्यात सुमारे 20 कोटी रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

कथित शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्रभर चॅटर्जी यांची चौकशी केली. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी 8 वाजता चॅटर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू केली, त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली. कथित घोटाळा झाला, तेव्हा चटर्जी राज्याचे शिक्षणमंत्री होते. अंमलबजावणी संचालनालय या घोटाळ्यात कथितरित्या सहभागी असलेल्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग पैलूची चौकशी करत आहे.

पार्थ चॅटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. सीबीआयने त्यांची दोनदा चौकशी केली. पहिली चौकशी 25 एप्रिल आणि दुसरी 18 मे रोजी झाली. सीबीआयने पश्चिम बंगालच्या शिक्षण राज्यमंत्र्यांचीही चौकशी केली आहे. याशिवाय त्यांच्या मुलीची शाळेत शिक्षिकेची नोकरी गेली आहे.

मंत्र्यांच्या निकटवर्तीयाच्या घरात सापडले 20 कोटी रुपये
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले. अहवालानुसार, ईडीने या काळात सुमारे 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या कारवाईचे जे चित्र समोर आले आहे त्यात 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा मोठा डोंगर पाहायला मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्पिता व्यतिरिक्त ईडीने इतर अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या यादीत मंत्री पार्थ चॅटर्जी, माणिक भट्टाचार्य, आलोक कुमार सरकार, कल्याण मोय गांगुली यांसारख्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे.