मुंबई : महाराष्ट्रात नुकतेच सत्तापरिवर्तन झाले. शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाट्यमय पद्धतीने राजीनामा दिला. उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने अचानक मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून सर्वांनाच चकित केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, भाजपने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का केले, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
Chandrakant Patil : काळजावर दगड ठेवून घेण्यात आला एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय, चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याने खळबळ
आता याबाबत महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आले आहे. एकनाथ शिंदे यांना काळजावर दगड ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. पनवेल येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षातील चित्र पाहता महाराष्ट्रात सरकार बदलण्याची गरज होती. त्यानुसार सत्ता बदलली आहे. परिवर्तनाच्या वेळी योग्य संदेश देऊ शकणाऱ्या तसेच चांगल्या निर्णयांना स्थिरता देणाऱ्या नेत्याची गरज होती. अशा वेळी केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला.
‘केंद्राकडून हा निर्णय अपेक्षित नव्हता’
चंद्रकांत पाटील म्हणाले की, या निर्णयामुळे आपण सर्वच दु:खी आहोत. वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होते. 5 वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर केंद्र असा निर्णय घेईल, असे कोणालाच वाटले नव्हते. केंद्राचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी काळजावर दगड ठेवून मान्य केल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सर्व राजकीय बदलानंतर पक्षातील लोक दु:खी झाले असले, तरी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. हीच पक्षाची ताकद असल्याचे ते म्हणाले.
‘पनवेलमध्ये झाली बैठक’
पनवेल येथे 23 जुलै रोजी भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, युवा मोर्चा, महिला, किसान मोर्चा यांच्यासह राज्यातील सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते. बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेसह या वर्षी होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज होण्याच्या सूचना देण्यात आल्या.