बहुमत दाखवा- निवडणूक आयोगाचे ठाकरे, शिंदे यांना आदेश

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे मात्र शिवसेनेवर दावेदारी साठीची लढाई सुरुच राहिली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना योग्य कागदपत्रांसह बहुमत सिद्ध करावे असे आदेश दिले असून त्यासाठी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यत मुदत दिली आहे. त्या नंतर दोन्ही बाजूंचे दावे विवाद यावर निर्णय घेतला जाणार आहे. दोन्ही गटानी खरी शिवसेना आमचीच असा दावा केला असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाण आपल्याला मिळावे असा आग्रह धरला आहे.

उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यात पक्षाचे काही सदस्य पक्षविरोधी कारवाया करत आहेत, त्यांनी शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उपयोग करून राजकीय दल स्थापन केल्याचा आरोप केला आहे. तसेच एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत आणि उदय सामंत यांना पदावरुन हटविले गेल्याचे नमूद केले आहे.

दुसरीकडे शिंदे गटाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह, निवडणूक चिन्ह आदेश १९६८ च्या १५ व्या कलमाप्रमाणे शिंदे गटाला दिल्याचे घोषित करावे अशी मागणी केली आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळावे यासाठी दाखल केलेल्या याचिकेत ५५ पैकी ४० आमदार, विधान परीषदेचे अनेक आमदार व १८ पैकी १२ खासदार शिंदे गटासोबत असल्याचा दावा केला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेची विभाजन स्थिती मान्य केली आहे आणि त्या समर्थनार्थ योग्य कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.