इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, कांडला पोर्टवर झाल्या ५ जी चाचण्या

टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यानी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी विमानतळावर फाईव्ह जी नेटवर्क चाचणी घेतली असून ट्रायच्या देखरेखीखाली या चाचण्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे इंदिरा गांधी विमानतळ देशातील फाईव्ह जी चाचणी होणारा पहिला विमानतळ बनला आहे. त्याचबरोबर कांडला येथील दिनदयाळ पोर्टवर सुद्धा प्रायोगिक तत्वावर फाईव्ह जी चाचण्या घेतल्या गेल्या असून देशातील अश्या चाचण्या होणारे ते पहिले बंदर बनले आहे.

या चाचण्यांचा उद्देश फाईव्ह जी कनेक्टीव्हिटी काही समस्या आहेत का तसेच खर्च कमी करण्यासाठी स्ट्रीट फर्निचर उपयोगात आणण्याची जी प्रक्रिया सुरु आहे त्याचीही चाचणी घेणे असा होता. माहिती प्रसारण आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले २०२२ अखेर देशात फाईव्ह जी सेवा सुरु होऊ शकते.

फाईव्ह जी स्पेक्ट्रम साठीची लिलाव प्रक्रिया २६ जुलै रोजी पूर्ण होत आहे. एअरटेल आणि रिलायंस जिओचे फाईव्ह जी नेटवर्क तयार असून त्यांना सरकारी मंजुरीची प्रतीक्षा आहे असे यापूर्वीच या दोन्ही कंपन्यांनी जाहीर केले आहे.