अमेरिकेत ७० टक्के नागरिक कोविड संक्रमित
अमेरिकेत सध्या उष्णतेची लाट असून कोविड १९ च्या ओमिक्रोन बीए.५ व्हेरीयंटने धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेतील ७० टक्के नागरिक करोना संक्रमित असल्याचे आकडेवारी सांगते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोविड संक्रमण झाल्याचे गुरुवारी व्हाईट हाउस कडून जाहीर केले गेले आहे. बायडेन यांना करोनाची लक्षणे अगदी सौम्य स्वरुपात असून ते घरातच विलगीकरणात असल्याचे सांगितले गेले असले तरी व्हाईट हाउसकडून त्यांना कोणती औषधे दिली जात आहेत याचा खुलासा केला गेलेला नाही.
हेल्थ अँड ह्युमन रिसोर्सेस कडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या ३५ राज्यात हॉस्पिटल मध्ये दाखल होत असलेल्या संक्रमितांची संख्या वाढली आहे तर २५ राज्यात आयसीयु मध्ये उपलब्ध असलेल्या बेड्स पेक्षा रुग्ण संख्या अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष बायडेन यांनी नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. व्हाईट हाउसचे रीस्पॉन्स को ओर्डीनेटर आशिष झा यांनी अमेरिकेत बीए.५ चा फैलाव फार धोकादायक पातळीवर असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत ८९.७ दशलक्ष म्हणजे ८ कोटी ९७ लाख लोकांना संक्रमण झाले असून आत्तापर्यंत एकूण १० लाख मृत्यू झाले आहेत.