नवी दिल्ली – देशात सलग दुसऱ्या दिवशी 21 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे, केरळमधील वायनाड जिल्ह्यात आफ्रिकन स्वाइन फ्लूने चिंता वाढवली आहे.
Double Attack : दुसऱ्या दिवशी 21 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर केरळमध्ये आढळला आफ्रिकन स्वाइन फ्लू
केरळ कोरोनाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकतेच राज्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्णही आढळून आला होता. शुक्रवारी सकाळी अद्ययावत झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे मृत्यूही वाढले आणि 60 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात देशात कोविड-19 चे 21,880 नवीन रुग्ण आढळले आहेत, 21,219 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि 60 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी गुरुवारी देशात 21,566 नवीन रुग्ण आढळले होते आणि बुधवारी 20,557 नवीन रुग्ण आढळले होते. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी ३१४ अधिक रुग्ण आढळले आहेत.
देशातील कोरोनाची स्थिती
एकूण प्रकरणे: 4,38,47,065
सक्रिय प्रकरणे: 1,49,482
एकूण रिकव्हरी : 4,31,71,653
एकूण मृत्यू: 5,25,930
एकूण लसीकरण: 2,01,30,97,819
केरळमध्ये ‘आफ्रिकन स्वाइन फ्लू’ची प्रकरणे
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मानंथवाडी येथील दोन पशुसंवर्धन केंद्रांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू (ASF) ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस, भोपाळ येथे नमुने तपासण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील दोन पशुसंवर्धन केंद्रातील डुकरांमध्ये या आजाराची पुष्टी झाली. पशुसंवर्धन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका केंद्रावर अनेक डुकरांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आता त्याच्या निकालाने या तापाची पुष्टी झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. तर दुसऱ्या केंद्रात 300 डुकरे मारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे विभागाने सांगितले. आफ्रिकन स्वाइन फीवर हा अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार आहे.
मानवाला नाही धोका
डॉ. सिंह यांनी सांगितल्यानुसार, ज्या भागात आफ्रिकन स्वाइन फिव्हरची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे, त्याच्या एक किलोमीटरच्या त्रिज्याला संक्रमित झोन म्हणून घोषित केले आहे. संसर्गाचा मानवांना धोका नसला तरी, आजारी डुकरांच्या संपर्कात येणारे पशुधन मालक किंवा कामगार इतर प्राण्यांना संसर्ग पसरवू शकतात.
भारतात प्रथमच 2020 मध्ये आढळून आली प्रकरणे
यातून मोठ्या प्रमाणात डुकरांचा मृत्यू होऊ शकतो किंवा खबरदारी म्हणून डुकरांना मारावे लागू शकते. 2020 मध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हरची प्रकरणे भारतात प्रथम आढळली. याआधी सप्टेंबर 2019 मध्ये चीनमध्ये या आजारामुळे मोठ्या प्रमाणात डुकरांचा मृत्यू झाला होता.