पवित्र मक्केत ज्यू पत्रकार, मुस्लीम जगतात हाहाकार

सौदी अरेबियातील मुस्लीम समाजाच्या पवित्र मक्का या ठिकाणी हज यात्रा नुकतीच पार पडली. जगभरातील मुस्लीम सुख, शांती साठी हज यात्रा करतात. मात्र मक्का नगरीत गैर मुस्लीम लोकांना प्रवेश बंदी आहे. इस्रायलचा एक ज्यू पत्रकार याच कारणाने चर्चेत आला असून त्याने मक्काप्रवेश तर केलाच पण तेथील अनेक स्थळांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यामुळे मुस्लीम जगतात हाहाकार माजला आहे.

इस्रायलच्या लोकप्रिय चॅनलवरून, वर्ल्ड न्यूज वरून एडिटर गिल तमारी यांनी मक्केत फिरतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत आणि अनेक महत्वाच्या ठिकाणांची माहिती सुद्धा दिली आहे. मक्का गेट आणि तेथील सीमेवरून आत जाऊन तमारी यांनी मक्केतील माउंटन अराफतवरून सेल्फी घेतल्या आणि त्या चॅनलवर पोस्ट केल्या तेव्हा मुस्लीम जगतात नाराजीची लाट उसळली असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेसाठी तमारी सौदी मध्ये गेले होते. तेथून त्यांनी मक्केत जाऊन रिपोर्टिंग केले आणि ते प्रकाशित केले. मुस्लीम देशांची नाराजी लक्षात आल्यावर त्यांनी माफी मागितली आहे पण रिपोर्ट चॅनल वरून हटविले नाहीत. मुस्लीम समाजाच्या भावनांना ठेच पोहोचविण्याचा माझा उद्देश नव्हता, पण तरीही माफी मागतो असे त्यांनी म्हटले आहे.  इस्रायलचे मंत्री इसावी फ्रेज यांनी तमारी यांच्या वर्तणुकीबद्दल खेद व्यक्त केला असून त्यांचे वर्तन बेजाबदार असल्याचे म्हटले आहे. याचा परिणाम सौदी आणि इस्रायल यांच्यातील संबंधावर पडणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.