मोठ्या संख्येने फेसबुक सोडत आहेत भारतीय महिला
भारतात फेसबुक सोडणाऱ्या युजर्सच्या संखेत पुरुषांच्या तुलनेत भारतीय महिलांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले आहे. यात प्रामुख्याने महिला वर्गाला त्यांची सुरक्षा आणि प्रायव्हसी यांची चिंता भेडसावते आहे असे कारण समोर आले आहे. या वर्षी २ फेब्रुवारीला मेटा प्लँटफॉर्मने फेसबुकच्या पहिल्या तिमाही मध्ये फेसबुक युजर्स संख्या घटल्याची सूचना दिली होती. त्याच दिवशी युएस टेक ग्रुपतर्फे भारतात फेसबुक व्यवसायातील स्वतःची परिस्थिती काय याविषयी निष्कर्ष काढणारी पोस्ट केली गेली होती.
२०२१ अखेर केल्या गेलेल्या या दोन वर्षांच्या अध्ययन काळात फेसबुक युजर्सना येणाऱ्या अनेक समस्या आणि अडथळे शोधले गेल्याचे समजते. निघालेल्या निष्कर्षानुसार भारतात फेसबुकचे ४५० दशलक्ष युजर्स आहेत आणि त्यात पुरुष युजर्सचे प्रमाण ७५ टक्के आहे. पण महिला युजर्सचे प्रमाण कमी होत असेल तर भारतात मेटा मोठे यश मिळवू शकत नाही असा दावा केला जात आहे. फेसबुक वरील न्युडीटी कंटेंट, किचकट डिझाईनची अॅप्स, स्थानिक भाषा, साक्षरता, व्हिडीओ कंटेंटची मागणी असणारे इंटरनेट युजर्स खुश नाहीत असे दिसून आले.
हे सर्व्हेक्षण हजारो लोकांमध्ये केले गेले असून आशिया पॅसिफिकच्या अन्य क्षेत्रातही फेसबुक युजर्सची वाढ प्रभावित होत असल्याचे समोर आले आहे. भारतात कोणत्याही अन्य देशापेक्षा जास्त फेसबुक युजर्स आहेत. भारतात निगेटिव्ह कंटेंट अधिक प्रचलित आहे आणि त्यामुळेही महिलांना घरातूनच फेसबुक वापरण्यापासून रोखले जाते असे सांगितले जात आहे.