जगातील पहिली मलेरियाविरोधी लस आली

जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर आफ्रिकेच्या तीन देशात, जगातील पहिली अधिकृत मलेरिया विरोधी लस तेथील मुलांना दिली जात असल्याची घोषणा केली आहे. मलेरिया विरुद्धच्या लढाईतील हे ऐतिहासिक यश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ‘मोस्कीरिस्क’ नावाने ही लस आली असून तिची निर्मित ग्लॅक्सोस्मिथक्लाईन म्हणजे जीएसके ने केली आहे. मात्र ही लस फक्त ३० टक्के प्रभावी आहे आणि त्यामुळे या लसीकरणाला आर्थिक समर्थन देता येणार नसल्याची घोषणा बिल आणि मेलिंडा फौंडेशनने केली आहे.

या लसीमुळे लाखो आफ्रिकी मुलांचे प्राण वाचणार असल्याचा दावा केला जात असून या लसीचे चार डोस द्यावे लागणार आहेत. मात्र आर्थिक समर्थन देणाऱ्या बिल फौंडेशनने त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. फौंडेशनचे प्रमुख वेक्लहोक यांच्या म्हणण्यानुसार लस फक्त ३० टक्के प्रभावी आहे. शिवाय ती महाग आहे. मलेरियाची लस बाजारात आणण्यासाठी फौंडेशनने अनेक वर्षे सहाय्य दिले आहे पण कमी प्रभावी लसीसाठी २० कोटी डॉलर्स द्यायचे कि त्याऐवजी मलेरियावरील अन्य उपचार, उत्पादन क्षमता, येऊ घातलेल्या अन्य मलेरिया लसी यासाठी हा खर्च करायचा असा प्रश्न आहे.

दरम्यान लस उत्पादक जीएसकेने २०२८ पर्यंत दरवर्षी दीड कोटी डोस उत्पादन होईल असे सांगितले आहे पण द. आफ्रिकेत दरवर्षी जन्म घेणाऱ्या दीड कोटी मुलांसाठी किमान १० कोटी डोसची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही