Shivsena Crisis : ‘धनुष्यबाणा’वर एकनाथ शिंदे गटाने ठोकला दावा, स्वतःला सांगितले खरी शिवसेना


मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ देण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या मान्यतेचा दाखला देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदारांनी बंडखोर नेते शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता. शिंदे यांनी 30 जून रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे यांनी मंगळवारी राहुल शेवाळे यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी घोषणा केली होती आणि पाचवेळा सदस्य असलेल्या भावना गवळी यांना मुख्य व्हीप म्हणून कायम ठेवले होते.

राहुल शेवाळे यांना सभागृह नेतेपदी मान्यता
लोकसभा अध्यक्षांनी शेवाळे यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात शिवसेनेचे नेते म्हणून मान्यता दिली. यापूर्वी, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे नाव आणि चिन्हावरील दाव्यांबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचे मत ऐकून घ्यावे, अशी विनंती केली होती.