Petrol-Diesel : पेट्रोल निर्यात कर रद्द, देशांतर्गत उत्पादनावरील विंडफॉल कर कपात


नवी दिल्ली : सरकारने बुधवारी पेट्रोल निर्यातीवर लादलेला तीन आठवड्यांचा जुना कर रद्द केला. यासोबतच डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर लागू होणारा विंडफॉल टॅक्स आणि कच्च्या तेलाच्या देशांतर्गत उत्पादनातही कपात करण्यात आली आहे.

सरकारने अधिसूचनेत म्हटले आहे की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानंतर पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर 6 रुपये दराने लागू होणारे निर्यात शुल्क रद्द करण्यात आले आहे. डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील करात अनुक्रमे 2 रुपये आणि 4 रुपये प्रति लिटर कपात करण्यात आली आहे.

कच्च्या तेलाच्या देशांतर्गत उत्पादनावरील करही 23,250 रुपयांवरून 17,000 रुपये प्रति टन करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ओएनजीसी, वेदांत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लि. सारख्या देशांतर्गत तेल उत्पादकांना फायदा होईल.

क्रूडच्या किमती घसरल्याने द्यावा लागला दिलासा
सरकारने 1 जुलै 2022 पासून तेल कंपन्यांच्या विंडफॉल नफ्यावर कर लागू केला होता. त्यानंतर काही दिवसांनी क्रूडच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने तेल उत्पादक आणि रिफायनरी कंपन्यांच्या मार्जिनवर परिणाम झाला आहे.

1 जुलै 2022 रोजी पेट्रोल आणि विमान इंधनावर 6 रुपये प्रति लिटर निर्यात शुल्क प्रति बॅरल $ 12 च्या समतुल्य होते. डिझेलवर 13 रुपये प्रति लिटर शुल्क प्रति बॅरल 26 डॉलर आणि देशांतर्गत तेल उत्पादनावर 23,250 रुपये प्रति टन विंडफॉल कर 40 डॉलर प्रति बॅरलच्या समतुल्य होते.