अदानी समूहाला 14000 कोटींची गरज, SBI कडून मागितले कर्ज, ही आहे संपूर्ण योजना


नवी दिल्ली : गौतम अदानी समूहाला गुजरातमधील मुंद्रा येथे नवीन प्लांट उभारण्यासाठी 14,000 कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी समूहाने स्टेट बँक ऑफ इंडियाशी (SBI) संपर्क साधला आहे. अदानी समूहाच्या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 19,000 कोटी रुपये असू शकते.

15 वर्षांच्या कर्जाच्या फ्रेमवर्कला अंतिम स्वरूप दिले जात असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने एका मिंट अहवालात म्हटले आहे. एसबीआय त्यांच्या खात्यांमध्ये सुमारे 5,000 कोटी रुपयांचे कर्ज ठेवणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तथापि, या मुद्द्यावर एसबीआय आणि अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेसच्या प्रवक्त्यांना पाठवलेल्या ईमेलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

या वर्षी मार्चमध्ये, अदानी समूहाने नवी मुंबईतील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी एसबीआयकडून 12,770 कोटी रुपयांचे कर्ज देखील मिळवले होते. हे कर्ज नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) या समूहाची आणखी एक उपकंपनी यांनी घेतले होते.

वृत्तानुसार, कोळशापासून पॉलिव्हिनाईल क्लोराईड (पीव्हीसी) बनवण्यासाठी मुंद्रामध्ये नवीन सुविधा तयार केली जात आहे. मुंद्रा येथे पेट्रोकेमिकल क्लस्टर विकसित करण्याच्या अदानी समूहाच्या योजनेचाही हा प्रकल्प भाग असण्याची अपेक्षा आहे.

त्याची उत्पादन क्षमता 2,000 किलो टन प्रतिवर्ष (KTPA) असेल आणि इमल्शन PVC, सस्पेंशन PVC आणि क्लोरीनेटेड PVC सारखी उत्पादने तयार करेल. कंपनीने 2021-22 च्या वार्षिक अहवालात मुंद्रा येथे एकूण 20 लाख मेट्रिक टन पीव्हीसीची क्षमता टप्प्याटप्प्याने विकसित केली जाईल असे सांगितले होते. 2,000 ktpa प्रकल्प पहिल्या टप्प्यात पूर्ण होईल आणि 2024 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. नुकतेच अदानी समूहाने मुंद्रा येथील ग्रीनफिल्ड कॉपर रिफायनरी प्रकल्पासाठी 6,071 कोटी रुपये उभे केले आहेत.