ब्रिटन मध्ये सुनक लिहिणार नवा अध्याय? पण मार्ग नाही सोपा

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथम विराजमान होउन भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणार का याचे उत्तर आता लवकरच मिळणार आहे. मात्र सुनक यांच्या साठी हा सोपा मार्ग नाही असे म्हटले जात आहे. बुधवारी या पदासाठी झालेल्या मतदानात अंतिम पाचव्या फेरीत सुनक यांनी १३७ मतांची दणदणीत आघाडी घेतली आहे. मात्र तरीही त्यांचा १०, डाउनिंग स्ट्रीटचा मार्ग कठीण असल्याचे मानले जात आहे.

४२ वर्षीय सुनक यांना आता टोरी सदस्यांच्या मध्ये कठीण मतदानाला सामोरे जावे लागणार आहे. सर्व्हेक्षणात सुनक यांच्या एकमेव प्रतिस्पर्धी लीज ट्रस यांच्याकडे मतदानाचा कल वाढेल असे दिसून आले आहे. हे दोघेच आता पंतप्रधान रेस मध्ये आहेत. सोमवारी बीबीसीवर या दोघात लाइव डिबेट होणार आहे. सुनक यांनी या पूर्वीच्या चर्चेमध्ये पंतप्रधान पदाची रेस केवळ पार्टी नेतृत्वाची रेस नाही तर ब्रिटनचे खरे संरक्षक म्हणून आपण या रेसकडे पाहतो असे म्हटले आहे.

सुनक यांनी त्याच्या भाषणात १९६० च्या दशकात पूर्व आफ्रिकेतून त्यांचा परिवार ब्रिटन मध्ये कसा आला, त्यांच्या वडिलांचे, आईचे आरोग्य क्षेत्रातील योगदान काय होते याची माहिती दिली आहे. डॉक्टर वडील यशवीर आणि फार्मासिस्ट आई उषा तसेच सासरे नारायण मूर्ती आणि सासूबाई सुधा मूर्ती यांच्या विषयीचा अभिमान सुनक यांनी वेळोवेळी बोलून दाखविला आहे. सुनक यांनी हिंदू हाच आपला धर्म असल्याचे स्पष्ट केले आहे आणि ते नियमित पणे मंदिरात जातात. जन्माने ब्रिटीश असले तरी ते हिंदू धर्माचे पालन करतात. २०२० मध्ये ११ डाउनिंग स्ट्रीट वरील आपल्या कार्यालय आणि निवासस्थळी दिवाळीच्या पणत्या लावून दिवाळी साजरी करणारे ते ब्रिटनचे पहिले अर्थमंत्री आहेत.

शेवटच्या रेस मध्ये सुनक यांना १,६०,००० मतदारांना आपल्या पारड्यात त्यांनी मत टाकावे यासाठी  उद्युक्त करावे लागणार आहे. त्यात ते किती यशस्वी होतात त्यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.