राष्ट्रपती भवन, मेजवान्या आणि तीन रंगांचे दिवे
आज देशाचे नवे राष्ट्रपती निवडले जात असून त्यासाठीची मतमोजणी सुरु झाली आहे. भाजप प्रणीत द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या मध्ये मुख्य लढत आहे. ३२० एकर परिसरात असलेले भारताचे राष्ट्रपती भवन जगातील काही मोठ्या राष्ट्रपती भवन मधील एक मानले जाते. या भवनाची अनेक वैशिष्टे आहेत. राष्ट्रपती भवन मध्ये अनेकदा देशी विदेशी खास मेहमानांसाठी मेजवान्या दिल्या जातात त्याही चर्चेचा विषय ठरतात. मात्र मेजवानी ज्या बँक्वेट हॉल मध्ये दिली जाते तेव्हा या काळात तेथे तीन रंगाचे लाईट विशेष भूमिका बजावत असतात. काय आहे त्यामागचा अर्थ?
हे लाईट हॉल मध्ये लावल्या गेलेल्या प्रत्येक तैलचित्रांवर आहेत. निळा, हिरवा आणि लाल अश्या तीन रंगांच्या लाईटचे खास महत्व आहे. जेथे मेजवानी आयोजित केली जाते त्या बँक्वेट हॉलचा कंट्रोल हेड बट्लरकडे असतो आणि तो तिथे उभा असतो. जेव्हा निळा लाईट लावला जातो त्याचा अर्थ पाहुणे मेजवानी साठी तयार झाले असा आहे. पदार्थ सर्व्ह करणाऱ्या सर्वांनी तयार रहा असा संदेश त्यातून दिला जातो. मग हिरवा लाईट लागतो. याचा अर्थ पाहुण्यांनी खुर्च्यांवर जागा घेतल्या आहेत असा आहे. या नंतर त्वरित एका पाठोपाठ एक पदार्थ वाढण्याची सुरवात होते.
सहा पाहुण्यांसाठी एक बट्लर असतो पण राष्ट्रपती आणि खास पाहुण्यांसाठी स्वतंत्र बट्लर असतो. भोजन संपवून पाहुणे उठू लागले कि तिसरा आणि शेवटचा लाल दिवा लागतो. लगेच वेटर्स पुढे होतात आणि प्लेट गोळा करून साफसफाई करतात. कुणी खास विदेशी पाहुणा येणार असेल तर त्याची सूचना परराष्ट्र मंत्रालयाकडून राष्ट्रपती भवनला दिली जाते. अश्या वेळी त्या त्या देशांचे खास पदार्थ शिवाय भारतीय पदार्थ बनविले जातात. सबंधित पाहुण्यांचा आवडीनिवडीचा विचार केला जातो.
राष्ट्रपती होणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःतर्फे मेनू मध्ये काही नवीन पदार्थ सुचवीत असते. डॉ. राजेंद्रप्रसाद यांना ताटात जेवण वाढलेले अधिक पसंत असे. तर वेंकटरमण राष्ट्रपती झाले तेव्हा इडलीला येथील पदार्थात खास स्थान दिले गेले असे सांगतात.