बिल गेट्सना मागे टाकून गौतम अदानी श्रीमंत यादीत पुढे

फोर्ब्सच्या जागतिक धनकुबेर यादीत भारताचे अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी चौथ्या क्रमांकावर आले असून त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. बिल गेट्स यांची संपत्ती १०२ अब्ज डॉलर्स आहे तर गौतम अदानी यांची संपत्ती ११४ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बिल गेट्स यांनी गेल्याच आठवड्यात २० अब्ज डॉलर्स त्यांच्या गेट फौंडेशनला दान केल्याने त्यांच्या संपत्ती मध्ये घट झाली आणि ते श्रीमंत यादीत पाचच्या नंबरवर गेले. याचा फायदा अदानी यांना मिळाला आणि त्यांनी चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. अर्थात भारतीय उद्योजकाची संपत्ती २०२१ च्या सुरवातीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. अदानी समूह इन्फ्रास्ट्रक्चर, वीज, ग्रीन एनर्जी, गॅस, पोर्ट अश्या उद्योगात असून अडाणी यांनी जगातील सर्वात मोठे हरित उर्जा उत्पादक बनण्याची तयारी केली आहे. त्यासाठी ते ७० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत.

दीर्घकाळ भारत आणि आशियातील एक नंबरचे श्रीमंत राहिलेले रिलायंस उद्योगसमूहाचे मुकेश अंबानी मात्र या यादीत मागे पडले आहेत. त्यांची संपत्ती ८७ अब्ज डॉलर्स असल्याचे फोर्ब्स यादीत नमूद केले गेले आहे.