परदेशातून मनीऑर्डर द्वारे पैसे मिळविण्यात भारत नंबर एक

डिजिटल बँकिंग मुळे आजकाल जगात कुठेही त्वरित पैसे पाठविणे शक्य झाले आहे मात्र आजही मनी ऑर्डर करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. कधी एके काळी एका ठिकाणाहून दुसरी कडे पैसे पाठविण्यासाठी मनी ऑर्डर ही महत्वाची सुविधा होती. भारतीयानी आजही मनी ऑर्डरचा सिलसिला सुरूच ठेवला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने शरणार्थी आणि प्रवासी भारतीय यांच्यावरील पहिला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार २०२१ मध्ये जगात प्रत्येकी ८ व्यक्तींमागे एक म्हणजे सुमारे १ अब्ज प्रवासी नागरिकांनी डॉलर्स रुपात विदेशातून मायदेशी मनी ऑर्डर केल्या आहेत. त्यात सर्वाधिक मनीऑर्डर आलेल्या पाच देशात भारत एक नंबरवर असून त्या नंतर चीन, मेक्सिको, फिलिपिन्स आणि इजिप्त यांचा नंबर आहे.

२०२१ मध्ये भारतात ८७ अब्ज डॉलर्स मनीऑर्डरच्या माध्यमातून आले आहेत. चीन आणि मेक्सिको मध्ये हा आकडा ५३ अब्ज डॉलर्स, फिलिपिन्स मध्ये ३६ अब्ज तर इजिप्त मध्ये ३३ अब्ज डॉलर्स असा आहे. विशेष म्हणजे मनी ऑर्डर्सने सर्वाधिक पैसा अमेरिकेतून आला आहे. त्यापाठोपाठ युएई, सौदी आणि स्वित्झर्लंड मधून मनी ऑर्डर आल्या आहेत. कोविड १९ संकटात देशाबाहेर गेलेल्या नागरिकांनी देशातील आपले कुटुंब, व मित्रांना या मार्गाने पैसे पाठविले आहेत असे दिसून आले आहे.