पुढच्या वर्षात देशात अंडरवॉटर मेट्रो धावणार

भारतात पुढच्या वर्षात पहिली वहिली अंडरवॉटर मेट्रो धावणार आहे. कोलकाता मेट्रो साठी हुगळी नदीच्या खालून १०.८ किमी चे बोगदे बनविण्याचे काम पूर्णत्वास जात असून पाण्याखालून ५२० मीटर वरून ही मेट्रो जाणार आहे. त्यासाठी दोन बोगदे केले गेले आहेत. यामुळे प्रवाशांना वेगळ्या प्रवासाचा अनुभव घेता येईल. अर्थात एक मिनिटापेक्षा कमी वेळात हे अंतर कापले जाईल असे सांगितले जात आहे.

चॅनल टनेल मधून जाणाऱ्या लंडन पॅरीस युरोस्टार प्रमाणे हे बोगदे आहेत. जगात फार कमी ठिकाणी पाण्याखालून रेल्वे मार्ग आहेत. कोलकता मेट्रो मार्गाचे हे काम एप्रिल २०१७ मध्ये सुरु झाले होते. १९८० मध्ये भारतातील पहिली मेट्रो कोलकाता येथे सुरु झाली होती आणि आता नदीच्या खालून जाणाऱ्या मेट्रोची सुरवात कोलकाता येथेच होत आहे. जमिनीखाली २६ मीटर वर बांधले गेलेले हे बोगदे १२० वर्षे सेवा देतील अश्या पद्धतीने बांधले गेले आहेत. या बोगद्यात पाण्याचा एक थेंब सुद्धा येणार नाही.

त्यासाठी कॉक्रीट मध्ये हायड्रोफिलेक गास्केट बसविले गेले आहेत. समजा काही कारणांनी पाणी आत येऊ लागले तर ही गास्केट उघडतील. आपत्कालीन परिस्थिती आलीच तर बाहेर पाडण्यासाठी वेगळे मार्ग तयार केले आहेत असे समजते.