ओमिक्रोनची ऑस्ट्रेलियात दहशत, हॉस्पिटल्स भरली

ऑस्ट्रेलियात बुधवारी कोविड १९ रुग्ण रेकॉर्ड संखेने हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले असून सरकारने सर्व व्यवसाय, कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ पुन्हा सुरु करावे आणि घरात सुद्धा मास्क वापरावे असा आग्रह केला आहे. त्याचबरोबर नागरीकानी बुस्टर डोस घ्यावा अशीही विनंती केली जात आहे. बुधवारी रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोविड १९ रुग्णांची संख्या ५३०० वर गेली असून जानेवारी मध्ये ओमिक्रोनच्या बीए.१ व्हेरीयंटची लागण झालेल्या ५३९० रुग्णाना रुग्णालयात भरती करावे लागले होते.

क्वीन्सलंड, तास्मानिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्यात सर्वाधिक संक्रमित आढळत आहेत. रॉयटरच्या वृत्तानुसार ओमिक्रोन बीए .४ आणि बीए .५ अत्यंत संक्रामक व्हेरीयंटची ऑस्ट्रेलियात जणू दहशत माजली आहे. या व्हेरीयंटच्या तिसऱ्या लाटेचा सामना देश करत आहे. गेल्या सात दिवसात ३ लाख केसेस समोर आल्या आहेत. मात्र आरोग्य अधिकारी प्रत्यक्षातील केसेस याच्या दुप्पट असाव्यात असा दावा करत आहेत. एकट्या मंगळवारी ५० हजार नव्या केसेस आल्या आहेत. ही दोन महिन्यातील सर्वात मोठी संख्या आहे.

प्रमुख्य चिकित्सा अधिकारी पॉल केली यांच्या मते कोविड नियंत्रणात आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. अन्यथा हॉस्पिटल मधील रुग्ण वाढ कायम राहील. वर्क फ्रॉम होम संक्रमण रोखण्याचा एक महत्वपूर्ण मार्ग आहे. बुस्टर बाबत नागरिक बेपर्वा आहेत. १६ वर्षांवरील ९५ टक्के नागरिकांनी दोन डोस घेतले आहेत. ऑस्ट्रेलियात करोना बळींची संख्या १०८४५ असून ७१ टक्के नागरीकानी तिसरा किंवा चौथा डोस घेतला आहे.