Simmons-ramdin Retirement : वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडूंची निवृत्ती


पोर्ट ऑफ स्पेन – वेस्ट इंडिजचे दोन दिग्गज लेंडल सिमन्स आणि दिनेश रामदिन यांनी सोमवारी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदिनने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. हे दोन्ही खेळाडू वेस्ट इंडिज संघाचा भाग नव्हते. बराच काळ संघाबाहेर राहिल्यानंतर 37 वर्षीय सिमन्स आणि रामदिन यांचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन करण्याचे दरवाजे जवळपास बंद झाले होते. यानंतर दोन्ही खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली.

दिनेश रामदिनने वेस्ट इंडिजकडून 74 कसोटी सामन्यात 2898 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 139 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2200 धावा आणि 71 टी-20 मध्ये 636 धावा केल्या आहेत. लेंडल सिमन्सने वेस्ट इंडिजसाठी 8 कसोटीत 278 धावा, 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1958 धावा आणि 68 टी-20 सामन्यांमध्ये 1527 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी एक विकेट घेतली आहे, तर टी-20 मध्ये त्याने सहा विकेट्स घेतल्या आहेत.

2016 च्या वर्ल्ड कपमधून भारताला काढले होते बाहेर
लेंडल सिमन्सने 2016 टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय खेळी खेळली. त्याने 51 चेंडूत 82 धावा केल्या आणि भारतीय संघाला T20 विश्वचषकातून बाहेर फेकले. यानंतर कार्लोस ब्रॅथवेटने बेन स्टोक्सच्या एका षटकात चार षटकार मारत कॅरेबियन संघाला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवले. सिमन्सला सुरुवातीला दुखापत झाली आणि 2016 च्या विश्वचषकातील सलामीचा सामना तो मुकला. यानंतर आंद्रे फ्लेचर जखमी झाल्याने सिमन्स संघात परतला. पहिल्याच सामन्यात त्याने अप्रतिम खेळी केली.

सिमन्सने आयपीएलमध्येही अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. याशिवाय, तो वेगवेगळ्या T20 लीगमध्ये कराची किंग्स, ब्रिस्बेन हीट, त्रिनबॅगो नाइट रायडर्स संघाचा देखील भाग होता.

यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदिन टी-20 लीगमध्ये विशेष काही करू शकला नाही. तो आयपीएलमध्येही खेळला नाही, पण त्याने कसोटीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. यामध्ये चार शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.