Sanjay Raut : सापांच्या भीतीने जंगल सोडत नाही… शिवसेनेवर ताबा मिळवण्याच्या तयारीत असलेल्यांना संजय राऊतांचा टोला


मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला ताब्यात घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी समिती बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कोणाचेही नाव न घेता एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर काव्यमय शैलीत लिहिले आहे की, ‘सापाचा फना चिरडण्याचे कौशल्य शिका, सापांच्या भीतीने जंगल सोडत नाही. या ट्विटच्या शेवटी, त्यांच्या परिचीत शैलीत, ‘जय महाराष्ट्र!!’ देखील लिहिले.

खरे तर उद्धव ठाकरे सध्या शिवसेनेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी झगडत आहेत. ते आणि त्यांचा पक्ष चक्रव्युहात अडकला आहे. यापूर्वीच 55 पैकी 40 आमदारांनी पक्ष सोडला आहे. याशिवाय नगरसेवकांनीही बंडखोरी केली आणि ते खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.

तुम्ही आम्हालाच काढून टाकत आहात
यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावत म्हणाले, शिवसेनेपासून फारकत घेतलेल्या लोकांच्या गटाने शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बनवली आणि आमची कार्यकारिणी बरखास्त केली… तुम्ही (एकनाथ शिंदे गट) तोडून निघून गेलात. 20 तारखेपासून सुप्रीम कोर्ट यावर सुनावणी करणार आहे. तुम्ही आमदार राहणार की नाही आणि तुम्ही आम्हालाच काढून टाकत आहात.

शिंदे गटाच्या बैठकीत 14 खासदारांनी लावली ऑनलाइन हजेरी
सोमवारी हॉटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीत शिवसेनेचे 14 खासदारही ऑनलाइन सहभागी झाले होते. शिवसेनेचे एकूण 18 खासदार असून त्यापैकी 14 खासदार शिंदे गटात सामील होण्याची चर्चा आहे. दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांना लोकसभेत शिवसेनेचे (शिंदे गट) नेते केले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर भावना गवळी यांची मुख्य सचेतक म्हणून नियुक्ती होऊ शकते. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच भावना गवळी यांना या पदावरून हटवले होते.