एकनाथ शिंदे यांच्या नव्या शिवसेना कार्यकारणीत उद्धव ठाकरेच अध्यक्ष

महाविकास आघाडी मधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनाच शिवसेना अध्यक्ष बनविले गेले असून एकनाथ शिंदे यांनी प्रमुख नेतेपद स्वीकारले आहे. पार्टीतून बंड केलेल्या अनेक आमदारांना पक्ष नेते, उपनेते म्हणून निवडले गेले आहे आणि आज प्रमुख नेते निवडणूक आयोगाला या संदर्भात सूचित करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे दिल्ली मध्ये दाखल झाले आहेत.

नवीन राष्ट्रीय कार्यकारणी स्थापन झाल्यावर जो प्रस्ताव मंजूर केला गेला आहे तो घेऊन दिल्लीत निवडणूक आयोगाला दिला जाणार आहे. नवी कार्यकारणी नेमण्याबाबतची बैठक सोमवारी दुपारी दक्षिण मुंबई मधील एका हॉटेल मध्ये झाल्याचे समजते. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नेमणूक केली गेली असून कालच शिवसेनेचा राजीनामा दिलेले माजी नेते रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची नेते म्हणून निवड केली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माजी बीएमसी नेते यशवंत जाधव, माजी मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, आमदार तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षाचे उपनेते म्हणून निवड केली गेली आहे. हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राउत यांनी शिंदे यांना हा अधिकार नसल्याचे सांगितले आहे. राउत म्हणाले,’ कॉमेडी एक्स्प्रेसचा हा दुसरा सिझन सुरु झाला आहे. ही कार्यकारणी कायदेशीर नाही. पहिला सिझन विधानसभेत झाला असून लोक त्यावर हसत आहेत.’