सासू,सासऱ्यांनी जे केलेय त्याचा मला अभिमानच- ऋषी सुनक

ब्रिटन पंतप्रधान निवडणुकीत तिसऱ्या फेरीमध्येही अघाडीवर असलेल्या ऋषी सुनक यांनी त्याचे सासू सासरे म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी आयुष्यात जे करून दाखविले आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे असे टीव्ही वरील एका चर्चेत सांगितले आहे. मिडिया सेक्शनने रविवारी आयटीव्ही चॅनलवर जी चर्चा आयोजित केली होती त्यात सुनक बोलत होते.

गेल्या काही दिवसापूर्वी ऋषी सुनक यांची पत्नी अक्षता यांच्यावर ब्रिटन मध्ये कर न भरल्याचे आरोप केले गेले होते. त्याला सुनक यांनी उत्तर देताना वरील विधान केले आहे. ४२ वर्षीय सुनक यांचा जन्म ब्रिटन मध्ये झाला आहे आणि आपण नेहमीच सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे ब्रिटीश करदाते आहोत असे ते म्हणाले. सुनक यांच्यावर अमेरिकेचे ग्रीन कार्ड धारक असल्याचे आरोप सुद्धा केले गेले होते तेव्हा त्यांनी चान्सलर पद मिळाल्यावर ग्रीन कार्ड सोडल्याचे उत्तर दिले आहे.

सुनक म्हणाले माझी पत्नी भारतीय आहे त्यामुळे तिला वेगळी वर्तणूक दिली जात आहे. अक्षता यांचे इन्फोसिस मध्ये शेअर्स आहेत आणि त्यापोटी त्यांना बरीच मोठी रक्कम मिळते. त्यावर त्यांनी ब्रिटन मध्ये कर भरावा असा आक्षेप घेतला जात होता. पण अक्षता यांची ही कमाई भारतातील आहे. वाद उत्पन्न झाल्यवर त्यांनी स्वेच्छेने ब्रिटन मध्ये कर देता यावा म्हणून स्वतःच्या नॉन नेटिव्ह स्टेट्सचा त्याग केला आहे.

सुनक म्हणाले, माझे सासरे नारायण मूर्ती यांच्याजवळ काहीच नव्हते तेव्हा त्यांनी एक स्वप्न पाहिले आणि त्यातून उद्योग उभा केला. त्यासाठीचे पहिले भांडवल सासूबाई सुधा यांनी स्वतःच्या बचतीतून पुरविले होते. आज इन्फोसिस ही जगातील प्रतिष्टीत कंपनी आहे आणि ब्रिटन मध्ये या कंपनीने हजारो लोकांना रोजगार दिला आहे. त्याचा मला अभिमान वाटतो.