लॉंग कोविडची लक्षणे महिलांमध्ये अधिक तीव्र

भारतात पुन्हा एकदा करोना फैलाव वेगाने होत असून अॅक्टीव्ह रुग्ण संख्या १ लाख ४० हजारावर गेली आहे. अर्थात रिकव्हरी रेट ९८ टक्के असल्याने हॉस्पिटल मध्ये भरती होण्याची वेळ कमी आहे. पण करोना मधून बरे झाल्यावर सुद्धा करोना पिच्छा सोडत नसल्याचे दिसते आहे. याला लॉंग कोविड असे म्हटले जाते. लॉंग कोविडची काही लक्षणे कॉमन आहेत पण पुरुष आणि महिला यांच्यामध्ये वेगळी लक्षणे दिसत असल्याचे समोर आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये लॉंग कोविड अधिक त्रासदायक असल्याचे नव्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे.

पियर रिव्ह्यू जर्नल करंट मेडिकल रिसर्च अँड ओपिनियन मध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालात महिलांमध्ये लॉंग कोविडची लक्षणे दिसण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत २२ टक्के जास्त आहे. थकवा, डोके दुखी, एकाग्रता कमी होणे, श्वास घेण्यास त्रास, सांधेदुखी, शिवाय ब्रेन फॉग, अंग बधीर होणे, मुंग्या येणे, कानात आवाज, झोप न येणे, नजर कमजोर अशी लक्षणे कॉमन आहेत पण महिलांना मूड जाणे, डोके दुखी, त्वचा समस्या, पचन समस्या, गॅस्ट्रोइंटेस्टीनल डीसऑर्डर अशी लक्षणे आहेत तर पुरुषांना मधुमेह, मूत्रपिंड, फुफ्फुस, छाती दुखणे, सांधे दुखी दीर्घ काळ सोसावी लागते आहे असे या अहवालात नमूद केले गेले आहे.