ब्रिटन मध्ये उष्णतेची तीव्र लाट, राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
ब्रिटन मध्ये सोमवारी सर्वाधिक तापमान नोंदविले गेले असून ४० डिग्री तापमानाची नोंद झाली. मंगळवारी पारा आणखी चढून ४२ डिग्रीची पातळी गाठेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना घराबाहेर शक्यतो पडू नये अश्या सूचना दिल्या आहेत. देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली गेली आहे.
यंदाच्या उन्हाळ्याने नागरिक हैराण झाले आहेतच पण रस्त्यावरील डांबर वितळणे, विमान तळाच्या रनवे वर खड्डे पडून ते खराब होणे असे प्रकार सुद्धा होत आहेत. सोमवारी लंडन ल्युटन एअरपोर्ट वरील उड्डाणे याच कारणाने रद्द केली गेल्याचे समजते. यंदा वर्षाच्या सुरवातीलाच तापमान ३० डिग्रीवर गेले होते. या लाटेनंतर आणखी एक उष्णता लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१९ मध्ये केम्ब्रिज येथे सर्वाधिक म्हणजे ३९ डिग्री तापमानाची नोंद झाली होती पण यंदा हा विक्रम सुद्धा मोडीत निघाला आहे.
हवामान विभागाने रेड अॅलर्ट जारी केला असून धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार मंगळवारी तापमान ४२ डिग्रीवर जाऊ शकते आणि त्यासाठी आपली तयारी नाही अश्या सूचना दिल्या गेल्या आहेत. या उष्णतेने हजारो मृत्यू होऊ शकतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच उष्णतेमुळे रेल्वे रूळ, ओव्हरहेड पॉवर लाईन्स, सिग्नल यंत्रणा यांच्यावर प्रभाव पडू शकतो त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असा इशारा केला गेला आहे.