जगातील सर्वात मोठे शिवमंदिर-अरुणाचलेश्वर मंदिर

श्रावण महिना जवळ येऊ लागला की शिवभक्त शिव आराधनेत लीन होऊन जातात. भारतात अनेक शिव मंदिरे आहेत. जगातील सर्वात मोठे शिवमंदिर तामिळनाडूच्या अन्नामलाई पर्वत रांगामध्ये आहे. अरुणाचलेश्वर किंवा अन्नामलाईयार मंदिर या नावाने ते प्रसिद्ध असून या मंदिर समूहाचा परिसर २५ एकर आहे.

श्रावण महिन्यात येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते आणि कार्तिक पौर्णिमेला येथे यात्रा भरते. अन्नामलाईची १४ किमीची परिक्रमा करून भाविक या मंदिरात इच्छापूर्तीसाठी नवस बोलतात. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने हंसाचे रुप घेऊन शिवाचा शिरोभाग पाहण्यासाठी उड्डाण केले पण त्याला शिरोभाग दिसू शकला नाही. तेथे महादेवाच्या मस्तकावर एक केवडा होता त्याला ब्रह्माने विचारले कि तू शिवाचा शिरोभाग पाहिला आहेस का?

केवड्याने तो ४० हजार वर्षे तेथेच आहे पण शिरोभाग पाहिला नाही असे उत्तर दिले. तेव्हा ब्रह्मदेवाने केवड्याला खोटी साक्ष देण्याची गळ घातली. केवड्याने ब्रहमदेवाने शिरोभाग पाहिल्याची साक्ष दिली खरी पण जेव्हा महादेवाला खरी गोष्ट कळली तेव्हा क्रोध आला. शिवाने ब्रह्मदेवाला तुझे मंदिर पृथ्वीवर बनणार नाही असा शाप दिला आणि केवड्याला शिव पूजेत तुला स्थान मिळणार नाही असा शाप दिला.

या मंदिरात पूर्व गोपूर ६६ मीटर उंचीचे आहे. हजारो खांब असलेल्या या मंदिरात पंचमहाभूतांपैकी अग्नीचे अस्तित्व आहे असे म्हटले जाते. यामुळे येथील शिवलिंग अग्नीलिंगम म्हणून प्रसिद्ध आहे. येथे आठ दिशांना आठ शिवलिंगे असून प्रत्येक शिवलिंगाच्या दर्शनाचा वेगळा लाभ मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.