या समाजात जन्मदर वाढीसाठी विशेष मोहीम

भारतात बड्या उद्योजकांच्या यादीत अनेक पारसी लोक आहेत मात्र हा समाज दिवसेनदिवस कमी होत चालला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या समाजातील विवाहयोग्य मुलामुलींकडून विवाह न करण्यास मिळणारे प्राधान्य आणि मुले जन्माला घालण्यात रस नसणे हे असल्याचे सांगितले जाते. परिणामी  अल्पसंख्यांक  मंत्रालयातर्फे या समाजातील मुलामुलीना विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ जियो पारसी’ ही मोहीम राबविली जात आहे. त्यात ऑनलाईन डेटिंग बरोबर कौन्सेलिंगवर भर दिला जात आहे.

पारजोर फौंडेशन प्रमुख शेरनाज कामा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले,’ पारसी समाजाचा प्रजनन दर ०.८ प्रती जोडपे असा आहे. दरवर्षी सरासरी २०० मुले जन्माला येतात तर सरासरी ८०० मृत्यू होतात. २०११ च्या जनगणनेनुसार पारसी समाजाची लोकसंख्या ५७२६४ होती. हीच लोकसंख्या १९४१ मध्ये १ लाख १४ हजारावर होती. म्हणजे आत्ता ती निम्म्याने घटली आहे. त्यामुळे या समाजाची परिस्थिती खराब झाली आहे.

नवीन राष्ट्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण सर्व्हेक्षणानुसार देशात हिंदूंचा प्रजनन दर १.९४, मुस्लीम २.३६, खिश्चन १.८८ तर शीख १.६१ आहे. जियो पारसी योजना २०१३ मध्ये सुरु केली गेली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे १५ जुलै पर्यंत ३७६ नवीन बाळे जन्माला आली आहेत. अविवाहित राहणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्के इतके वाढले आहे. त्यात महिला स्वतंत्र राहण्यास प्राधान्य देत आहेत. ३० टक्के जोडप्यांना एकच मूल आहे. ६५ वर्षांवरील लोकसंख्या जास्त असल्याने एकेका जोडप्याला घरातील ८-८ लोकांची जबाबदारी घ्यावी लागते असे दिसून येत आहे.

कोविड काळात पारसी समाजासाठी ऑनलाईन डेटिंग सुरु झाल्याचा फायदा झाल्याचे सांगून कामा म्हणतात, आता वधू वरांचे मेळावे सुद्धा भरविले जात आहेत. शिवाय पारसी महिलेने अन्य जातीतील मुलाशी विवाह केला तर त्यांना होणाऱ्या मुलांना पारसी मानले जात नाही हा सुद्धा मोठा दोष आहे. परिणामी हा समाज वेगाने कमी होतो आहे.