निवृत्तीनंतर सुद्धा धोनी आणि विराट पेक्षा सचिनची संपत्ती अधिक

सलग चोवीस वर्षे क्रिकेटच्या मैदानावर तळपणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने खेळातून निवृत्ती घेतली त्याला ९ वर्षे होऊन गेली. मात्र आजही त्यांची संपत्ती श्रीमंत क्रिकेटपटू यादीत गणना होणाऱ्या महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली पेक्षा अधिक आहे. सर्वाधिक कमाई असलेल्या निवृत्त सेलेब्रिटी खेळाडू मध्ये सचिन एकमेव भारतीय क्रिकेटर आहे. २००१ मध्ये एका ब्रांडबरोबर १०० कोटींचे डील केलेला तो पहिला भारतीय क्रिकेटर बनला होता.

वोगच्या रिपोर्ट नुसार सचिनची संपत्ती १२७१ कोटी असून धोनीची  ८४६ कोटी तर विराटची ७०१ कोटी आहे. सचिनचे मुंबईत बांद्रा येथे अलिशान घर असून त्याची किंमत १०० कोटी आहे. १९२० सालचा हा जुना बंगला पारसी कुटुंबाकडून सचिनने ३९ कोटी मध्ये खरेदी केला होता आणि त्यानंतर तेथे नवीन बंगला बांधला गेला. या बंगल्याचा सचिनने १०० कोटींचा विमा केल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याचा कुर्ला कॉम्प्म्लेक्स मध्ये एक अलिशान फ्लॅट आहे. केरळ मध्ये वॉटर फेसिंग अलिशान घर असून त्याची किंमत ७८ कोटी आहे. लंडन मध्ये लॉर्डस मैदानाचे दर्शन होईल अश्या इमारतीत त्याचे घर असून त्याची किंमत ४७ कोटी आहे.

सचिनला घड्याळे, कपडे, जोडे, कार्स, परफ्युम्स यांची आवड आहे. त्याच्या संग्रही महागडी घड्याळे आणि कार्स आहेत. त्यांच्या कडे १३ कोटी किमतीच्या सात अलिशान कार्स असून त्यातील फेरारी विशेष आहे. कारण ही कार त्याला मायकेल शुमाकर याने गिफ्ट दिली होती. शिवाय त्यांच्या संग्रही त्याने १९८९ मध्ये विकत घेतलेली मारुती ८०० सुद्धा आहे.

एक विशेष म्हणजे सचिनकडे असलेली सगळी घड्याळे ७-८ मिनिटे पुढे असतात. कारण सामना असो, नेट प्रॅक्टीस असो, एखादा इव्हेंट असो, मिटिंग असो कुठेही सर्वात अगोदर पोहोचायला सचिनला आवडते. सचिन रेस्टॉरंट, आयपीएल फ्रान्चाईजी, एका क्लोदिंग ब्रांडचा मालक आहे आणि आजही जाहिराती मधून तो वर्षाला १८ कोटींची कमाई करतो असे समजते.