राष्ट्रपती निवडणूक, खासदारांना हिरव्या तर आमदारांना गुलाबी मतपत्रिका

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे मतदान सकाळी १० वा. सुरु झाले असून सायंकाळी ५ वा. संपेल. ही निवडणूक विधानसभा आणि लोकसभा मतदानापेक्षा अनेक बाबीत वेगळी असते. विशेष म्हणजे या मतदानासाठी ईव्हीएमचा वापर केला जात नाही. तसेच खासदारांना हिरव्या तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका दिल्या जातात. शिवाय खास जांभळ्या रंगाच्या पेनाने मत दिल्याची खूण करावी लागते आणि हे मतदान गुप्त पद्धतीने होते. भाजप आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीचे यशवंत सिन्हा यांच्यात मुख्य लढत होत असून मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

आजच्या निवडणुकीत ४८०० खासदार आणि आमदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर केला जात नाही कारण मते प्राधान्य क्रमाने द्यायची असतात. जेवढे उमेदवार असतील त्यांना पहिले प्राधान्य, दुसरे प्राधान्य या प्रमाणे मते दिली जातात. ईव्हीएम हे मते जमा करण्याचे यंत्र आहे आणि त्यात एक बटण दाबून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला एकच मत द्यायचे असते. परिणामी प्राधान्य क्रमाने मतदान होणाऱ्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकात ईव्हीएमचा वापर केला जात नाही.

खासदारांना हिरव्या आणि आमदारांना गुलाबी रंगाची मतपत्रिका देण्यामागे मतमोजणी सुलभ व्हावी हा हेतू असतो. जांभळ्या रंगाच्या विशेष शाईच्या पेनाने मतदानाची खूण केली जाते कारण या मुळे डुप्लीकेट मतदानाला आळा घालता येतो असे सांगतात. या वेळच्या मतदानाची मोजणी २१ जुलै रोजी होत असून नवीन राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेणार आहेत.