टेनिसपटू मारिया शारापोवाकडे आला चिमुकला पाहुणा

रशियाची माजी टेनिस स्टार मारिया शारापोवा हिच्या घरी छोटा पाहुणा आला असल्याची बातमी तिनेच इन्स्टाग्रामवर दिली आहे. ३५ वर्षीय मारिया हिने मुलाला जन्म दिला असून नवजात बालक आणि तिचा नियोजित वर अलेक्झांडर गिल्केस यांच्या सह एक फोटो तिने शेअर केला आहे. २०१८ पासून मारिया आणि अलेक्झांडर रिलेशनशिप मध्ये आहेत आणि २०२० मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. मारियाने बाळाचे नाव ‘थियोडर’ असे ठेवले असून या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘ईश्वराची देणगी’ असा आहे.

पाच वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या मारियाने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळल्यावर टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ग्लॅमरस आणि वेगवान टेनिस साठी प्रसिद्ध असलेल्या मारियाचे चाहते नाराज झाले होते. मात्र मारियाने फिटनेसच्या कारणामुळे निवृत्ती घ्यावी लागत असल्याचा खुलासा केला होता. लहान वयात तिने टेनिस मध्ये मोठे यश मिळवले होते आणि करीयरच्या उच्च शिखरावर असताना २०१६ मध्ये तिच्यावर डोपिंग केल्याच्या आरोपावरून १ वर्षासाठी बंदी घातली गेली होती. त्यानंतर ती खेळात परतली पण पूर्वीचे यश मिळवू शकली नाही. अलेक्झांडर आणि मारियाची ओळख टेनिस स्टेडीयम मध्येच झाली होती. तो तिचे सर्व सामने पाहायला उपस्थित राहत असे असे सांगितले जाते.