कहाणी द्रौपदी टूडू ते द्रौपदी मुर्मू या प्रवासाची
यावेळी राष्ट्रपती पदाची उमेदवारी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी आदिवासी महिला नेत्या द्रौपदी मुर्मू यांना दिली आणि द्रौपदी मुर्मू एकदम चर्चेत आल्या. ओडीसाच्या मयूरभंज पासून २५ किमीवर असलेल्या एका खेड्यात सासर असलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या पहाडीपूर गावात आज त्यांच्या नावाची मोठमोठी पोस्टर लागलेली दिसत आहेत. गावकरी यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.त्याचवेळी द्रौपदी टूडू ते द्रौपदी मुर्मू या त्यांच्या प्रवासाच्या कथा मोठ्या प्रमाणावर सांगितल्या जात आहेत. द्रौपदी आणि त्यांचे पती शामचरण यांचा प्रेमविवाह होता आणि या विवाहाला द्रौपदी यांच्या वडिलांची मुळीच संमती नव्हती.
गावातील बुजुर्ग आणि शामचरण यांचे काका सांगतात, भुवनेश्वर येथे द्रौपदी पदवी शिक्षण घेत होती आणि तिच्या गावातून भुवनेश्वर येथे जाऊन शिकणारी त्यावेळी ती पहिली मुलगी होती. शामचरण हेही तेव्हा भुवनेश्वर येथे शिक्षण घेत होते. त्या दोघांची ओळख झाली आणि शामचरण यांनी द्रौपदी यांच्या सोबत विवाह करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ते द्रौपदी टूडू यांच्या वडिलांना भेटायला उपरवाडा गावात आले पण वडिलांनी नकार दिला. तेव्हा होकार मिळेपर्यंत त्यांनी गावातच मुक्काम टाकला आणि अखेर या लग्नाला संमती मिळवली.
हे दोघे ज्या संथाल आदिवासी समाजाचे आहेत त्यात विवाहात मुलाला हुंडा द्यावा लागतो. द्रौपदी आणि शामचरण यांच्या विवाहात एक गाय, बैल, १६ जोड्या कपडे असा हुंडा ठरला आणि १९८० मध्ये हा विवाह पार पडला. पण गावकऱ्याना लग्नाची तारीख मात्र सांगता येत नाही.
आपल्या गावाची सून राष्ट्रपती होणार म्हणून पहाडपूर आणि आपल्या गावाची लेक राष्ट्रपती होणार म्हणून उपरवाडा या दोन्ही खेड्यात जल्लोष सुरु असून द्रौपदी यांचे मोठ मोठे पोस्टर येथे लावले गेले आहेत.