यांना अचानकच सापडला खजिना


अचानक खजिना सापडल्याच्या अनेक गोष्टी आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अलिबाबा आणि चाळीस चोर, अरेबियन नाईट्स, ट्रेजर आयलंड अश्या कितीतरी कादंबऱ्यांतून नायकाला अचानक खजिना कसा सापडला त्याची वर्णने आहेत. मात्र जगामध्ये काही व्यक्ती खरच अश्या आहेत ज्यांना अगदी अचानक खजिना हाती लागला. आता हे त्यांचे सुदैव म्हणा किंवा योगायोग म्हणा, पण खजिना हाती लागल्यानंतर या व्यक्तींचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.

२००९ सालच्या जुलै महिन्याध्ये इंग्लंड येथील हॅमरविच या स्टॅफर्डशायर प्रांतातील एका शेतामध्ये टेरी हर्बर्ट नावाच्या माणसाला अचानक मोठा खजिना सापडला. मेटल डीटेक्टर घेऊन शेतामध्ये काहीतरी शोधत असताना सोन्याच्या काही मूर्ती त्याला त्या शेतात सापडल्या. पुढील पाच दिवसांमध्ये टेरीने अजून २४४ सोन्याच्या मूर्ती त्या शेतातून खणून बाहेर काढल्या. ह्या मूर्ती बाहेर काढल्यानंतर, त्या अतिशय प्राचीन आणि मौल्यवान असल्याचे टेरीच्या लक्षात आले. त्याने स्थानिक प्रशासनाला या बाबत माहिती दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्या मूर्ती ताब्यात घेतल्या. त्या शेतजमिनीचा मालक फ्रेड जॉन्सन याची परवानगी घेऊन स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेतामध्ये अजूनही खोदकाम करीत, अजून मूर्ती मिळतात का, याचा शोध घेतला. त्यानंतर एकूण १३०० मूर्ती उत्खननामध्ये सापडल्या. त्या मूर्तींची किंमत ३.२८५ मिलियन पौंड इतकी असल्याचे सांगितले गेले. बर्मिंगहॅम म्युझियम आणि पॉटरीझ म्युझियम यांनी मिळून या मूर्तींची किंमत, अर्धी टेरी हर्बर्टला आणि अर्धी फ्रेड जॉन्सन यांना देऊन त्या मूर्ती हस्तगत केल्या.

अमेरिकेतील एका लहानश्या घरामध्ये तीन विद्यार्थी भाडे देऊन रहात होते. कली ग्वास्ती, रीस वेर्कोवेन आणि लारा रुसो अशी त्या तीन मुलांची नावे. आपल्या राहत्या घरामध्ये कोणी आले गेले तर त्यांना बसविण्यासाठी त्या तिघांनी जुने पुराणे सामान विकणाऱ्या दुकानामधून एक सोफा खरेदी केला. त्या सोफ्याचे हात काहीतरी विचित्र दिसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नीट न्याहाळून पाहिल्यानंतर सोफ्याच्या हातांना झिप लावली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ती झिप उघडल्यानंतर त्यात त्यांना एक पाकीट सापडले, त्या पाकिटामध्ये ४००० डॉलर इतकी रक्कम होती, इतकेच नाही, तर त्या सोफ्यावर अनेक ठिकाणी अश्याच झीप लावलेल्या होत्या, आणि त्या प्रत्येक झिप च्या आतमध्ये नोटांनी भरलेले लिफाफे होते. सर्व लिफाफ्यांमध्ये मिळून, एकूण ४०,८०० डॉलर इतकी रक्कम त्या तिघांना सापडली. मात्र ती रक्कम त्यांनी स्वतः न ठेवता, तो सोफा कोणाच्या मालकीचा होता याचा शोध लावला. त्यात त्यांना असे कळले की तो सोफा एका अतिशय वृद्ध, एकाकी, आजाराने ग्रासलेल्या महिलेचा होता. सोफ्याच्या आतमध्ये सापडलेली सर्व रक्कम त्या तीन विद्यार्थ्यांनी त्या वृद्ध महिलेस देऊ केली.

१९९६ साली ब्रॉड्वे आणि सन्स ऑफ लंडन यांनी बनविलेला पियानो ग्राहम आणि मेग हेमिंग्स या लंडन मधील दाम्पत्याने खरेदी केला. त्यांनतर २०१६ साली हा पियानो त्यांनी तेथील बिशप्स कासल कम्युनिटी कॉलेजला देऊन टाकला. २०१७ साली पियानोमध्ये काही दुरुस्ती करण्यास एका तज्ञाला बोलाविले असता, त्याला त्या पियानोमध्ये चक्क सोन्याची नाणी सापडली. त्याने त्वरित कॉलेज च्या मुख्याध्यापकांच्या कानांवर ही गोष्ट घातली. अधिक शोध घेतल्यानंतर त्यांना त्या पियानोमधून तब्बल ९०० सोन्याची नाणी मिळाली. हा पियानो मूळचा कोणाच्या मालकीचा आहे याचा शोध आता सुरु आहे.

Leave a Comment