बहुगुणकारी आवळा


क जीवनसत्व आणि अँटी ऑक्सिडंट्स यांनी परिपूर्ण असा आवळा आपल्या स्वास्थ्यवर्धक गुणांसाठी ओळखला जातो. आयुर्वेदामध्ये सांगितल्या प्रमाणे आवळ्यामुळे शरीरातील त्रिदोष – वात, कफ आणि पित्त यांचे संतुलन शरीरामध्ये राखले जाते. आवळ्याचे सेवन केल्याचे काही फायदे पाहूया.

आवळ्याच्या नियमित सेवनामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अनेक शास्त्रीय प्रयोगांच्या परिणामस्वरूप हे सिद्ध झाले की आवळ्यामध्ये अ जीवनसत्व आणि केरोटीन मुबलक मात्रेमध्ये असल्याने त्याच्या सेवनामुळे दृष्टी सुधारते. सतत केल्या गेलेल्या वाचनामुळे किंवा सतत कॉम्पुटर वर काम केल्याने डोळ्यांवर ताण येऊन डोळे दुखू लागतात. या साठीही आवळ्याचे सेवन फायदेशीर आहे. विशेषकरून रातांधाळेपणा कमी करण्यासाठीही आवळा उपयोगी आहे.
आवळा हे एक उत्तम हेयर टॉनिक आहे. आवळ्याच्या सेवनामुळे केस अकाली पिकण्याची समस्या दूर होऊ शकते.

आवळ्यामुळे हेयर फॉलिकल्स सुदृढ बनतात तसेच स्काल्प मध्ये ( केसांच्या मुळांशी )रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत मिळते. आवळ्याच्या सेवनामुळे केस गळणे कमी होऊन केस दाट होण्यासही मदत मिळते. आवळ्याचा समावेश आपल्या आहारात तर करावाच, पण त्या शिवाय आठवड्यातून एकदा मेथ्यांची पावडर, शिकेकाई पावडर आणि आवळ्याची पावडर एकत्र करून रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी केसांना लावावी. या मुळे केसांचे आरोग्य चांगले राहील.

आवळ्यामध्ये असलेले क जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये अगदी सहजी शोषले जाते. क जीवनसत्वामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच सर्दी पडसे हे ही त्रास आवळ्याच्या सेवनाने लवकर बरे होतात. सर्दी झालेली असल्यास आवळ्याची पावडर दोन चमचे मधामध्ये मिसळून घेतल्यास लवकर आराम पडतो.

आवळ्यामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अॅस्ट्रींजंट तत्वे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होण्यास मदत होते. फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये जास्त असतील तर वय जास्त नसताना सुद्धा चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा डोकावू लागतात. पण आवळा फ्री रॅडिकल्स कमी करत असल्यामुळे आपला चेहरा आणि एकंदर शरीर चिरतरुण दिसत राहील. काही ना काही कारणांनी शरीरामधील पेशींचे नुकसान झालेले असते. पेशींचे आरोग्य सुधारण्यास आवळा हितकारी आहे.

आवळ्याच्या सेवनामुळे कोलेस्टेरोल, रक्तदाब आणि मधुमेहासारखे विकार नियंत्रणामध्ये राहतात. आवळ्यामध्ये असलेले क्रोमियम ‘बॅड कोलेस्टेरोल’ कमी करण्यास मदत करते. आवळ्यामुळे शरीरात इन्सुलिनची मात्रा ही वाढते त्यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. दररोज आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment