हरविल्या आणि सापडल्या मात्र नाहीत..


दररोजच्या बातम्यांमध्ये आपण कोणी ना कोणी व्यक्ती हरविल्याच्या घटना पहात किंवा ऐकत असतो. यातील काही व्यक्ती सापडतात, काहींचा कालांतराने शोध लागतो तर काहींचा थांगपत्ता कधीच लागत नाही. अश्याच काही घटनांनी त्या त्या वेळी लोकांचे लक्ष वेधून घेतले कारण त्या त्या घटनांमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्ती अगदी अचानक बेपत्ता झाल्या. त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे कुठलेही धागेदोरे तपास अधिकाऱ्यांना मिळाले नाहीत किंवा त्यामागची कारणे ही स्पष्ट होऊ शकली नाहीत. अक्षरशः हेवेमध्ये विरघळून गेल्यासारख्या या व्यक्ती जगाच्या पाठीवरून गायब होऊन गेल्या.

जिम सुलीवान : १९६९ साली जिम सुलीवान या संगीतकाराने “ufo “ नावाचा संगीताचा संग्रह ध्वनिमुद्रित केला. त्यामधील गाण्यांमध्ये एका घटनेचे वर्णन केलेले होते. एक व्यक्ती आपल्या परिवारापासून वेगळी होते आणि नंतर दुसऱ्या ग्रहावरील जीवांनी त्या व्यक्तीचे अपहरण केले असे काहीसे वर्णन करणारी गाणी जिम यांनी ध्वनिमुद्रित केली होती. त्यानंतर काही काळाने जिम आपल्या लॉस अॅन्जीलीस येथील घरातून नॅशव्हिल कडे जाण्यास आपल्या गाडीतून निघाला. त्या प्रवासातच जिम अचानक बेपत्ता झाला. त्याची गाडी व गिटार पोलिसांना मिळाले पण जिमचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. जिम च्या असे अचानक गायब होण्यामागच्या रहस्याचा उलगडा आजतागायत झालेला नाही.

मेडेलाईन मॅककन : गॅरी आणि केट मॅककॅन दाम्पत्य आपल्या तीन मुलांसमवेत सुट्टीसाठी पोर्तुगाल येथे आले होते. रात्री जेवण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी आपल्या तीनही मुलांना हॉटेल मध्ये जेवायला घालून झोपविले आणि मग जवळच असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यास ते दाम्पत्य बाहेर पडले. जेवण करून परत आल्यानंतर केट आपल्या मुलांना पाहण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली असता त्यांची मेडेलाईन ही तीन वर्षांची मुलगी तिच्या बेडवर नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने त्याबद्दल लगेचच गॅरीला सांगितले. पोलिसांना या घटनेची सूचना मिळताच त्यांनी तपास सुरु केला. पण त्या तपासातून कुठलेही निष्पन्न झाले नाही. ती तीन वर्षांची चिमुरडी नक्की कुठे हरविली हे आज ही न सुटलेले कोडे आहे.

हॅरोल्ड होल्ट : हॅरोल्ड होल्ट हे एक बडे व्यक्तिमत्व होते. होल्ट हे ऑस्ट्रेलिया चे सतरावे पंतप्रधान होते. १७ डिसेंबर १९६७ साली होल्ट आपल्या काही मित्र मंडळींसोबत मेलबोर्नहून निघाले. ब्रिटीश नौकापटू ( yachtsman ) अॅलेक रोज याचा नौका प्रवास सुरु होताना पहावयास ही मंडळी निघाली होती. वाटेमध्ये दुपारच्या वेळी होल्ट यांच्या आवडत्या चेवीयट समुद्र किनाऱ्यावर ही मंडळी थांबली. त्या दिवशी समुद्राला भरती असून उंच उंच लाटा उसळत होत्या. असे असतानाही होल्ट यांनी समुद्रामध्ये पोहायला जाण्याचे ठरविले. पोहता पोहता होल्ट अचनक दिसेनासे झाले. ते पाहून बाकीच्या लोकांनी त्वरेने पोलिसांना मदतीसाठी बोलाविले. लवकरच शोध मोहीम सुरु झाली. अनेक पोलिसकर्मी, सैन्याचे जवान, तरणपटू यांनी अव्याहत शोध घेऊनही होल्ट यांचा शोध लागू शकला नाही. होल्ट स्वतः उत्तम पोहणारे आणि डायव्हिंग करण्यात निष्णात असूनही पोहताना कसे गायब झाले हे गूढ आज ही उकललेले नाही.

Leave a Comment