आपण कसे जीवन जगत असतो याची आपल्यालाच कल्पना नसते. व्यायाम करणे चांगले असते हे काय कोणाला माहीत नाही का? पण माहीत असूनही सगळेच लोक काही रोज व्यायाम करीत नाहीत. सगळ्याच व्यसनांच्या बाबतीत असे घडते. धूम्रपानाला काही वेगळा नियम नाही. भारतातल्या पाच मोठ्या शहरांतल्या काही धूम्रपींना या बाबत विचारले असता दर दहा धूम्रपींपैकी ९ जणांनी आपल्याला धूम्रपान सोडण्याची तीव्र असल्याचे सांगितले. पण इच्छा असली तरी प्रत्यक्षात ते सोडण्याची वेळ येते तेव्हा आपण ते सोडू शकत नाही हे लक्षात येते. निर्धार केला तरी नकळपणे हात सिगारेटच्या खोक्याकडे जातो आणि आपण सिगारेट पेटवून कधी ओढायला लागलो हे लक्षात येत नाही. व्यसन काही सुटत नाही.
कळते पण वळत नाही
यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सर्वांनीच आपल्याला धूम्रपानाचे विपरीत परिणाम माहीत आहेत हे स्पष्ट केले. पण ते माहीत असूनही आणि ते टळावेत यासाठी धूम्रपान सोडावे लागेल हे मान्य असूनही आपण धूम्रपान सोडू शकत नाही असे त्यांनी कबूल केले. धूम्रपान करणारा आणि न करणारा यातला फरकही या निमित्ताने समोर आला आहे. धूम्रपान करणाराला जास्त मानसिक त्रास सहन करावा लागतो. हे प्रमाण १७८ टक्क्यांनी जास्त असते. या संबंधात १ हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले. मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, बंंगलुरू आणि लखनौ या शहरांत हे सर्वेक्षण करण्यात आले. ७५ टक्के धूम्रपींनी आपण आजारी असलो तरीही धूम्रपान सोडू शकत नाही असे कबूल केले. दहा पैकी आठांनी आपण सकाळी झोपेतून उठल्यावर पहिल्यांदा सिगारेट पेटवीत असतो असे मान्य केले.
धूम्रपान करणारांपैकी ६५ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. तर ८० टक्के धूम्रपींचे कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण जास्त असते असे आढळले आहे.८८ टक्के लोकांनी आपण वयाच्या २४ व्या वर्षाच्या आतच सिगारेट प्यायला सुरूवात केली असल्याचे म्हटले तर ५५ टक्के लोकांनी आपण केवळ मजा म्हणून तिला जवळ केले पण नंतर मात्र तिच्या आहारी गेलो असे म्हटले. सिगारेट किंवा विडी ओढणारांचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने काही संघटना जनप्रबोधनास उद्युक्त झाल्या असून त्याचाच एक भाग म्हणून सुरूवातीला या पाच शहरात हे सर्वेेक्षण करण्यात आले असून त्यात या बाबी उघड झाल्या आहेत. समुपदेशनाने धूम्रपान करण्यात यश येईल अशी आशा त्यांना वाटते. तसे न केल्यास कर्करोगाचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.