शांतपणे जेवणे आवश्यक


सध्या आपली जीवनशैली पार बदलून गेलेली आहे. त्यातल्या त्या जेवण्याच्या पध्दती आणि वेळा यात मोठा बदल झालेला असल्यामुळे त्याचे पचनशक्तीवर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः टी. व्ही. बघत बघत जेवण करण्याची पध्दत चांगलीच रूढ झालेली आहे. ती चुकीची आहे, असे अनेक प्रकारे सांगितले जाते. काही आस्तिक लोक आहेत त्यांचा तर या पध्दतीला मोठाच विरोध आहे. कारण आपण जेवत असताना टी. व्ही. वर जी दृश्ये बघतो त्यामध्ये हिंसाचार जास्त असतो आणि अशी हिंसक दृश्ये बघत जेवण केल्याने त्या जेवणाचे आपल्या मनावर होणारे परिणामही हिंसक स्वरूपाचे असतात. तेव्हा टी. व्ही. बघत जेवणार्‍यांची प्रवृत्ती सात्विक नसते. म्हणून टी. व्ही. बघत जेवू नये असा सल्ला जुन्या काळचे लोक देत असतात.

पूर्वीच्या काळी जेवणाची एक पध्दत असायची. जेवण प्रसन्न मनाने करावे असा सल्ला दिला जायचा. जेवणाची पंगत बसलेली असे. एकट्या दुकट्याने जेवण्याची पध्दत नव्हती. जेवणाला मोठी पंगत बसली की जेवणाचा प्रारंभ श्‍लोकाने केला जात असे. त्या श्‍लोकामध्ये जेवण करणे हे केवळ उदरभरण नाही तर ते यज्ञकर्म आहे असे समजावे असे म्हटलेले असते. जेवणाच्या अधूनमधूनसुध्दा श्‍लोक म्हटले जातात. जेवणार्‍यांच्या समोर रांगोळी काढलेली असते. उदबत्या लावलेल्या असतात आणि अशा सुगंधी प्रसन्न वातावरणात जेवण केले तर ते अंगी लागते, असे सांगितले जात असे. अर्थात या सगळ्या पध्दतीने जेवण करायचे झाल्यास ते टी. व्ही. समोर बसून कधीच करता येणार नाही. म्हणजे या जुन्या पध्दतीच्या पुरस्कर्त्यांना टी. व्ही. समोर बसून, टी. व्ही.चे कार्यक्रम बघत बघत जेवण्याची रीत अजिबात मान्य नाही.

मात्र या सगळ्या गोष्टी मानसिकदृष्ट्या योग्य आहेत. सध्याच्या पिढीला वेगळ्या शास्त्रात सांगितल्याशिवाय कळत नाही. तेव्हा असे सांगावे लागते की टी. व्ही. समोर बसून जेवण केल्याने अन्नपचन होत नाही. टी. व्ही. वरचे कार्यक्रम रहस्यमय, भीतीदायक, भेसूर संगीतासह आणि मनाला धक्के देत सादर केलेलेे असतात. अशा कार्यक्रमातून तोंडाला आणि घशाला कोरड पडते. कोरड पडली की आवश्यक तेवढी लाळ तोंडात तयार होत नाही आणि लाळ कमी निर्माण झाली की अन्नपचन होत नाही. कारण पचनक्रियेमध्ये लाळ निर्माण होणे, ती चावलेल्या अन्नात मिसळणे आणि असे मिसळलेले अन्न जठराकडे जाणे महत्त्वाचे मानलेले असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment