राणी आपल्या पर्स् द्वारे देते आपल्या स्टाफला सूचना


इंग्लंड ची राणी दुसरी एलिझाबेथ ही आपल्या पर्स मध्ये घराच्या किल्ल्या किंवा आपला फोन नेते अशी समजूत असेल तर ती सपशेल चुकीची आहे. मग या पर्सचा वापर राणी करते तरी कसा, हे जाणून घेणे मोठे रोचक आहे. काही वर्षांपूर्वी राणीच्या खास मदतनीसाने, राणी आपल्या पर्स मध्ये एक छोटा आरसा, एक लिपस्टिक, एक पेन, वाचण्याचा चष्मा आणि काही मिंट च्या गोळ्या इतकी सामग्री ठेवत असल्याचे म्हटले होते. रविवारच्या दिवशी चर्च मध्ये देण्यासाठी काही अतिशय नेटकी घडी घातलेल्या नोटा ही राणीच्या पर्स मध्ये असतात. पण राणी आपली पर्स फक्त एवढ्यासाठी वापरत नाही. आपल्या पर्स धरण्याच्या पद्धतीतूनही राणी आपल्या स्टाफला सूचना देत असते.

कुठल्याही समारंभाच्या वेळी कोणाशी संभाषण चालत असताना, राणीने आपली पर्स एका हातातून दुसऱ्या हातामध्ये घेतली, तर तिला संभाषण आटोपते घ्यायचे आहे हे तिच्या स्टाफ मधील मदतनिसांना लगेच समजते. पण पर्स ची केली गेलेली हे हालचाल आजूबाजूच्या लोकांच्या लक्षातही येत नाही. केवळ राणी आणि तिचे खास स्टाफ मेंबर यांच्यामधील हे सांकेतिक संभाषण असते.

एखाद्या मेजवानीच्या प्रसंगी जर राणीने आपली पर्स जेवणाच्या टेबल वर ठेवली तर मेजवानी आटोपती घेण्यासाठी हा संदेश असतो. त्यानंतर साधारणपणे पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये मेजवानी आटोपती घेतली जाते. जर राणी ने आपली पर्स जेवणाच्या टेबल वर न ठेवता, आपल्या पायाशी, जमिनीवर ठेवली तर मात्र तिच्या मदतनिसांची पळापळ होते, कारण राणीशी आसपासचे लोक जे संभाषण करीत असतात, त्यामध्ये तिला अजिबात रस नसल्याचे तिच्या मदतनिसांना जमिनीवर ठेवलेली पर्स बघून समजते. अश्या वेळी मेजवानी ताबडतोब आटोपती घ्यावी लागते.

राणी आणि तिच्या मदतनिसांमध्ये चालत असलेले हे सांकेतिक संभाषण मोठे गमतीचे जरी वाटत असले, तरी तिच्या या न बोलता दिल्या जाणाऱ्या सूचना लक्षात येण्यासाठी तिच्या मदतनिसांना किती तत्पर राहावे लागत असेल याची कल्पना करावी.

Leave a Comment