पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी घराची निवड करताना….


शहरात शिक्षण घेताना निवासाची सोय हा कळीचा मुद्दा ठरतो. त्यासाठी होस्टेलमध्ये राहणं वा पेईंग गेस्ट म्हणून राहणं हे पर्याय असतात. हल्ली पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाकडील ओढा वाढला आहे. परंतु यासाठी घराची निवड करताना काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात.

हॉस्टेल उपलब्ध नसेल तर वेगळी रूम घेऊन राहता येतं. आजकाल पेईंग गेस्ट म्हणून राहण्याचा पर्याय उपलब्ध असून त्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु पेईंग गेस्टसाठी घराची निवड करताना खालील बाबी लक्षात घ्या.

* घर घेताना कोणत्याही ब्रोकरची मदत घेणं शक्‍यतो टाळावं. कारण ब्रोकरला अतिरिक्‍त शुल्क द्यावं लागतं. त्या ऐवजी घर शोधण्यासाठी स्वत: प्रयत्न करा. यामुळे मनासारखं घर मिळणं शक्‍य होईल.

* राहण्याचं ठिकाण कॉलेजपासून फार लांब असू नये. शैक्षणिक संस्थेच्या जवळच्या घरांचं भाडं जास्त असू शकतं. कमी भाड्यात थोडं लांब घर घ्यायचं तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय नीट आहे किंवा कसं हे तपासून घ्यायला हवं. कॉलेजला वेळेवर पोहोचण्यासाठी बस किंवा प्रसंगी झटपट रिक्षा मिळेल असं ठिकाण निवडणं हिताचं ठरतं.

* शैक्षणिक संस्थांच्या आसपास राहणारे अनेकजण घरं भाड्याने देतात. याविषयी माहिती देणारी पत्रकं परिसरात पहायला मिळतात. वा परिसरातील दुकानदारांकडूनही याची माहिती मिळते. परंतु त्यावर विसंबून न राहता इतर विद्यार्थ्यांचा सल्ला घ्यायला हवा. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे किंवा इतर दुकानदार यांच्याकडे चौकशी करता येऊ शकते. त्यातून सारासार विचार करून योग्य निर्णय घ्यायला हवा.

* शहरात उच्च शिक्षणासाठी, अभ्यास करण्यासाठी आला आहात याचं भान राखायला हवं. त्यामुळे पेईंग गेस्ट म्हणून राहताना घर सर्व सोयी-सुविधांनी युक्‍त असायला हवं अशी अट ठेऊ नका. प्राथमिक सोयी-सुविधा, स्वच्छता या बाबींकडे मात्र लक्ष द्यायला हवं.

* राहण्यासाठी निवड करावयाच्या ठिकाणच्या आजुबाजूला फार गोंगाट नसेल याची खात्री करून घ्या. बाजारपेठा, शैक्षणिक साहित्य विकणारी दुकानं, लायब्ररी घरापासून जवळ असावी किंवा किमान या ठिकाणी पोहोचण्याची सोय असायला हवी.

* पीजी म्हणून कितीजण राहणार आहात हे ठरवणं महत्त्वाचं आहे. कारण या माहितीवरून राहण्यासाठी किती खोल्याचं घर हवं हे ठरवता येईल. अर्थात, एकत्र राहिल्याने घरखर्च वाटून घेता येऊ शकतो.

Leave a Comment