हृदयविकाराचे वय घटले


१९७० च्या दशकामध्ये हृदयविकाराने मरण पावणार्‍या लोकांचे सरासरी वय ५० ते ६० वर्षे असे होते. म्हणजे साधारणतः लोक किमान ५० व्या वर्षांपर्यंत हृदयविकाराचा कसलाही त्रास न होता निरामय जीवन जगत असत. त्यानंतरसुध्दा काही वर्षांनी त्यांचे मृत्यू हृदयविकाराने होत असत. परंतु आता दिल्लीतील काही हृदरोग विशेषज्ञांनी हृदयविकार होण्याच्या वयाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. १५ वर्षांपूर्वी साधारण चाळीशीतील लोक हृदयविकाराचा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन आपल्याकडे यायला लागले परंतु अलीकडच्या पाच वर्षात तर २० आणि ३० वर्षांची मुले किंवा मुली हृदय विकाराची तक्रार घेऊन येत असून हृदयविकार होण्याचे वय झपाट्याने घसरत चालले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत अभ्यास केला असून १९७० ते २००० या ३० वर्षात हृदयविकार होणार्‍या रुग्णांच्या संख्येत ३०० टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर हृदयविकार जडण्याचे वयही घटत चालल्याचे जागतिक आरोग्य संघटनेला आढळून आले आहे. तरुण वयातच हृदयविकार का बळावत आहे या विषयी आता चर्चा व्हायला लागली आहे. डॉ. निलेश गौतम या हृदयविकार तज्ञाने या मागे प्रदीर्घ काळ काम करत राहणे आणि धूम्रपान ही दोन कारणे प्रामुख्याने असल्याचे म्हटले आहे. व्यायामाचा अभाव, अनियमित झोप, सातत्याने येणारा तणाव आणि फास्टफूडचे नको एवढे सेवन हीही कारणे हृदयविकाराच्या मागे असल्याचे डॉक्टरांचे आहे.

या प्रकाराला आळा घालायचा असेल तर खालील पथ्ये पाळावीत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते प्रत्येकाने आठवड्यात किमान १५० मिनिटे म्हणजे दररोज सरासरी २० मिनिटे तरी व्यायाम केला पाहिजे. त्याशिवाय सगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. जेव्हा आपल्याला अधिक घाम येत असेल, छातीवर दडपण आले असे वाटत असेल, खोकला आल्यानंतर तो दीर्घकाळ टिकत असेल तर या सगळ्या गोष्टी हृदयविकाराची नांदी ठरू शकतात. तेव्हा प्रत्येकाने किमान दर सहा महिन्याला हृदयविकाराच्या निमित्ताने वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजेच. शिवाय वरील लक्षणे दिसू लागताच आवर्जुन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. विशेषतः दीर्घ श्‍वास घेण्यातील अडचणी, रक्तवाहिन्यावरील दबाव, सतत थकल्यासारखे वाटणे आणि वारंवार होणारी डोकेदुखी याही लक्षणांच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment