गुजरात एसआयटीच्या अहवालात मोठा खुलासा, अहमद पटेलच्या सांगण्यावरून नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी तीस्ता सेटलवाडला मिळाली होती मोठी रक्कम


अहमदाबाद : गुजरात एसआयटीने शुक्रवारी सत्र न्यायालयात सांगितले की कार्यकर्ता तीस्ता सेटलवाड, निवृत्त डीजीपी आरबी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट हे 2002 च्या दंगलीशी संबंधित प्रकरणातील मोठ्या कटाचा भाग होते. त्यावेळी ‘साम दाम दंड भेद’ या धोरणाखाली तत्कालीन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पाडण्याचा किंवा अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी काँग्रेसकडून षड्यंत्रकारांना निधीही मिळाला होता.

एसआयटीने केला आरोपींच्या जामिनाला विरोध
शुक्रवारी एसआयटीने दंगलीशी संबंधित प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला. यासोबतच काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरून या आरोपींनी गुजरातची प्रतिमा खराब करण्याचा कट रचला असल्याचा दावा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. अहमद पटेल त्यावेळी राज्यसभेचे खासदार आणि पक्षप्रमुख सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.

प्रतिज्ञापत्रात दावा – तीस्ताला मिळाले होते 30 लाख रुपये
तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर निरपराध लोकांसह विविध अधिकार्‍यांना गोवण्यात आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी गुजरातमधील राजकीय पक्षांकडून बेकायदेशीर आर्थिक लाभ आणि बक्षिसे दिल्याचा दावा यात करण्यात आला आहे. एका साक्षीदाराच्या जबाबाचा हवाला देत तीस्ता सेटलवाड यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे माजी राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडून 30 लाख रुपये घेतल्याचा दावा एसआयटीने केला आहे.

राज्यसभेची उमेदवारी न दिल्याने तिस्ता यांची नाराजी
2002 च्या दंगली प्रकरणांमध्ये तत्कालीन भाजप सरकारच्या वरिष्ठ नेत्यांची नावे गोवण्यासाठी तीस्ता सेटलवाड दिल्लीला भेट देत होत्या आणि राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भेटत होत्या असा दावा एसआयटीने केला आहे. तीस्ता सेटलवाड यांनी 2006 मध्ये त्यांना राज्यसभेची उमेदवारीची संधी न दिल्याने त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती, असा दावाही या शपथपत्रात करण्यात आला आहे.

भाजपवर केला हल्लाबोल
या खुलाशानंतर भाजपने काँग्रेसला घेरण्यास सुरुवात केली आहे. ‘अहमद पटेल हा फक्त चेहरा होता, खरा कट सोनिया गांधींचा होता’ असा आरोप भाजपने केला आहे. अहमद पटेल यांनी सोनिया गांधींच्या सांगण्यावरून काम केले. गुजरातला बदनाम करून निवडून आलेले सरकार पाडण्याच्या कटाचा हा भाग होता.

गुजरात दंगलीप्रकरणी गेल्या महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली होती. त्यानंतरच गुजरात एटीएसने तीस्ता सेटलवाड या कार्यकर्त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. तीस्ताशिवाय श्रीकुमार आणि भट्ट यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.