उत्तर प्रदेशात पाच नद्यांच्या संगमक्षेत्रात सुरु होतेय आयुर्वेद पर्यटन

जगातील एकमेव अश्या ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेशातील बीहड भागात, पाच नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणी लवकरच आयुर्वेद पर्यटन केंद्र सुरु होत असून १७ जुलै रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. या ठिकाणी आयुर्वेद उपचारासह थंड आणि गरम वालुका स्नानाची खास व्यवस्था केली गेली आहे. गरम आणि थंड वाळूने स्नान हा एक प्राचीन उपचार असून अनेक रोगात त्याचा उपयोग होतो. गरम वाळू स्नान उपचारासाठी लोक इजिप्तच्या सहारा वाळवंटातील सिवा घाटी येथे तर थंड वाळू स्नानासाठी मलेशियाला जातात. उत्तर प्रदेशातील या आयुर्वेद पर्यटन केंद्रावर या दोन्ही सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत.

चंबळ यमुना संगमावर जुहीखा आणि तातारपूर गाव यांच्या मध्ये असलेल्या विशाल वाळवंटात चंबळ फौंडेशन बीहड यांनी दीर्घ काळ ही योजना व्हावी म्हणून प्रयत्न केले आहेत. बीहड येथे प्रचंड प्रमाणावर दुर्मिळ वनौषधी सापडतात. शिवाय येथील वाळू स्वच्छ आणि चमकदार आहे.

या आयुर्वेद पर्यटन केंद्रासाठी तज्ञ आयुर्वेद डॉक्टर्सची टीम तैनात केली गेली आहे. तीव्र स्वरूपाच्या वेदना, स्नायूदुखी, सांधे दुखी, डिप्रेशन, अश्या अनेक आजारांवर येथे उपचार होणार आहेत. त्यात आयुर्वेदातील कवळ, गंडूष, नेती, नेत्राधावन, अभ्यंग, शिरोधारा, मड थेरपी असे प्राचीन काळापासून रुळलेले उपचार आहेत तसेच योग उपचार सुद्धा आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही