मोफत बुस्टर करोना डोससाठी प्रचंड गर्दी
देशात करोनाचे नवे नवे व्हेरीयंट आणि त्यामुळे निर्माण होऊ शकणारा धोका, शिवाय बुस्टर डोस घेण्यात नागरिक करत असलेली चालढकल लक्षात घेऊन केंद्र सरकारने शुक्रवार पासून ७५ दिवस मोफत बुस्टर डोस योजना सुरु केली असून पहिल्याच दिवशी या डोस साठी लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी देशभरात १३ लाख ३० हजार जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. हे प्रमाण नेहमीच्या तुलनेत १६ पट अधिक असल्याचे समजते.
१० एप्रिल २०२२ पासून सरकारने करोना बुस्टर डोस उपलब्ध करून दिला होता. रोज सरासरी ८१ हजार बुस्टर डोस दिले जात असल्याचे दिसून आले होते. आरोग्य मंत्रालयाने १८ ते ५९ वयोगटात ९० हजार तर ६० पेक्षा अधिकच्या वयोगटात २ कोटी ७८ लाख डोस दिल्याचे जाहीर केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी शुक्रवारी निर्माण भवन लस शिबिरात कोविड लसीकरण अमृत महोत्सव योजना उद्घाटन केल्यावर लगेचच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोस साठी रांगा लागल्याचे चित्र होते.
केंद्राने या पूर्वी साठ पेक्षा जास्त वयाचे लोक, हेल्थ वर्कर आणि फ्रंट लाईन कर्मचारी यांना मोफत बुस्टर डोस योजना सुरु केली होती.आता १८ वर्षांवरील सर्वाना मोफत डोस या नव्या योजनेखाली दिले जाणार आहेत.