मास्टरब्लास्टर सचिनचे नवे रेकॉर्ड
क्रिकेटचा भगवान, मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याने त्याच्या कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड नोंदविली आहेत आणि हा सिलसिला अजून थांबलेला नाही. १५ जुलै रोजी सचिनने आणखी एक रेकॉर्ड नोंदविले आहे. हे क्रिकेटशी संबंधित नाही मात्र क्रिकेटचा संदर्भ त्याला नक्कीच आहे. सचिनने त्याच्या अधिकृत सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर १ हजारावी पोस्ट करून हे रेकॉर्ड केले आहे. सचिन सध्या पत्नी अंजली हिच्यासोबत लंडन मध्ये आहे.
लंडन मधून हे रेकॉर्ड करताना शतकांचे शतक पूर्ण करणाऱ्या या महान फलंदाजाने पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्याचे चाहते खुश झाले आहेत. क्रिकेटची मक्का असा लौकिक असलेल्या लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर वेस्ट इंडीजचे दिग्गज खेळाडू गॅरी सोबर्स यांच्या सोबतचा एक फोटो सचिनने पोस्ट केला आहे. हा फोटो वेगाने व्हायरल झाला असून अगदी कमी वेळात त्याला १६ लाख लाईक मिळाले आहेत. सचिनने या फोटोच्या कॅप्शन मध्ये लॉर्डसवर सर गॅरी सोबर्स यांच्यासोबत सामना पाहिला. १ हजारावी पोस्ट यापेक्षा चांगली कोणती? असे म्हटले आहे. लॉर्डस क्रिकेट ग्राउंडच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर सुद्धा हा फोटो शेअर केला गेला असून त्याखाली ‘एका फोटोत ४२,३८९ रन्स’ असे म्हटले गेले आहे.