चला नितांतसुंदर जिभी येथे

पावसाळ्यात डोंगरदऱ्या, पहाडात फिरण्याची मजा काही वेगळीच असते. कडक उन्हाळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी पर्यटकांची पाउले अशी ठिकाणे शोधू लागतात. पण अनेकवेळा आपण जाणार तेथे प्रचंड गर्दी झालेली असते आणि मग या भटकंतीची मजा किरकिरी होते. हे सर्व टाळायचे असेल तर हिमाचल मधील जिभी या ठिकाणाचा नक्की विचार करा. मनाली किंवा कुल्लूला जाण्याचा प्लॅन केला असेल तर जिभीची भेट अजिबात चुकवू नका. या दोन्ही लोकप्रिय पर्यटन स्थळांपासून जिभी अगदी जवळ आहे.

येथे तुम्ही निसर्गसौदर्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकताच पण मनाली, कुल्लू येथील गर्दीपासून सुटका मिळवू शकता. हवी ती शांती, उंच हिरवेगार पहाड, धबधबे, नदी, सरोवर, शांत सुंदर पाउलवाटा आणि स्वप्नातली वाटावी अशी सुंदर, सुबक लाकडी घरे यांचा आनंद येथे मिळतो. तशी येथे हॉटेल्स सुद्धा आहेत. शिवाय अनेक कॅफे, रेस्टॉरंट तुमच्या सेवेसाठी आहेत. कुटुंब, मित्रमंडळी यांच्या सोबत क्वालिटी टाईम येथे तुम्ही नक्की मिळवू शकता. ट्रेकिंगची आवड असले तर आसपास डोंगरात ट्रेक करून अनेक मनोहर धबधबे पाहू शकता.

जालोरी पास हायकिंग, सरेलसर लेक, शेषनाग महाराज मंदिर या ठिकाणी अवश्य भेट द्यावी अशी ही ठिकाणे नयनरम्य आहेत.