केरळच्या सराफाने अनोखी अंगठी बनवून केले गिनीज रेकॉर्ड
केरळमधील सराफाने २४ हजार पेक्षा जास्त हिरे जडवून मश्रूमच्या थीमवरची अंगठी डिझाईन केली आहे. या साठी त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यात आली आहे. केरळ च्या एसडब्ल्यूए डायमंड्सचे अब्दुल गफूर अनादियान यांनी एका अंगठीत सर्वाधिक हिरे सेट करून स्पार्कलिंग रेकॉर्ड तोडल्याचे गिनीज बुकने जाहीर केले आहे. ५ मे रोजी हे रेकॉर्ड केले गेले.
गफूर यांनी २४६७९ नैसर्गिक हिरे जडवून मश्रूमच्या आकाराची ही अंगठी तयार केली. त्यासाठी त्यांना तीन महिने लागले. या अंगठीचे नामकरण ‘अमी’ असे केले गेले असून या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे अमरत्व. गफूर या विषयी बोलताना म्हणाले, मश्रूम म्हणजे अळंबीला ही एक प्रकारची श्रद्धांजली आहे. अळंबी हे अमरत्व, दीर्घायुष्याचे प्रतीनिधित्व करते.
गिनीज बुकने या अंगठीचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात सर्व बाजूनी अंगठी दिसते आहे. या ज्वेलर्सच्या कामाची क्वालिटी यातून दिसते आहे. गिनीज बुकने नोंद करून घेताना हिर्यांची गुणवत्ता, चमक, त्याचे पैलू या सर्व बाबी विचारात घेतल्या आहेत. मायक्रोस्कोपचा वापर हिरे मोजण्यासाठी केला गेला असे समजते. या पूर्वीचे रेकॉर्ड भारताच्याच मेरठ येथील सराफ हर्षित बन्सल यांच्या नावावर होते. त्यांनी १२६३८ हिरे जडवून अंगठी बनविली होती.