IND vs ENG : फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीला मिळाला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा पाठिंबा, जिंकली भारतीय चाहत्यांची मने


क्रिकेटमध्ये हे फारच दुर्मिळ आहे, जेव्हा एखादा फलंदाज फॉर्ममध्ये नसतो आणि त्याला कट्टर प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने पाठिंबा दिलेला असतो. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत हा प्रकार घडला आहे. आजकाल तो आपल्या परिचित शैलीत मोठी खेळी खेळू शकत नाही. माजी क्रिकेटपटू, क्रिकेटपंडित आणि अनेक क्रिकेट चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. त्याला संघातून वगळण्याची मागणीही केली जात आहे. अशा परिस्थितीत विराटला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची साथ मिळाली आहे.

खरं तर, गुरुवारी (15 जुलै) लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट 16 धावा करून बाद झाला. त्याने 25 चेंडूंचा सामना करत तीन चौकार मारले. कोहलीचे शॉट्स पाहून लोकांना वाटले की आज त्याचा दिवस आहे, पण तसे झाले नाही. डेव्हिड विलीच्या चेंडूवर विराटने यष्टिरक्षक जोस बटलरकडे झेल दिला. बाद झाल्यानंतर काही वेळातच बाबरने विराटसोबतचा एक फोटो शेअर करून भारतीय चाहत्यांची मने जिंकली.

बाबरने काय केले ट्विट?
पाकिस्तानी कर्णधाराने IST रात्री 12:29 वाजता ट्विट केले. बाबरने लिहिले, ही वेळ निघून जाईल, हिंमत ठेव. त्याचे ट्विट लोकांना खूप आवडले आणि भारतीय त्याचे कौतुक करत आहेत. कोहली आणि बाबर हे जागतिक क्रिकेटचे दोन मोठे फलंदाज आहेत. तो विराटला फॉलो करतो, असे बाबरने अनेकदा सांगितले आहे. त्याला त्याच्यासारखी फलंदाजी करायची आहे. बाबरनेही स्वत:ला सिद्ध केले आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.

दोन टी-20मध्येही अपयशी ठरला होता विराट
यापूर्वी कोहलीने बर्मिंगहॅम आणि ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळले होते, परंतु दोन्ही वेळा मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. त्याने अनुक्रमे 1 आणि 11 धावा केल्या होत्या. विराट दमदार पुनरागमन करून टीकाकारांना चुकीचे सिद्ध करेल, असा विश्वास बाबरला आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे रविवारी (17 जुलै) ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे होणार आहे. तिथे विराट मोठी खेळी खेळू शकतो.

लॉर्ड्स मॅचमध्ये काय घडले?
पहिल्या वनडेत इंग्लंडला 110 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यातही शानदार गोलंदाजी केली. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संपूर्ण संघ 49 षटकांत 246 धावांत गारद झाला. मोईन अलीने 47 धावा केल्या. भारताकडून चहलने चार विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन बळी घेतले. मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी एक बळी मिळवला.

गोलंदाजांचा हा प्रयत्न फलंदाजांनी उधळला. टीम इंडिया 38.5 ओव्हरमध्ये 146 रन्सवर गारद झाली. सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने 29-29 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 27 आणि मोहम्मद शमीने 23 धावा केल्या. विराट कोहली 16 धावा करून बाद झाला. शिखर धवनने नऊ, युझवेंद्र चहलने तीन आणि जसप्रीत बुमराहने नाबाद दोन धावा केल्या. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णाला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडकडून रीस टोपलीने 24 धावांत सहा विकेट घेतल्या.