महाराष्ट्रात आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू, गुजरातच्या आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट; मुंबईच्या दिशेने जाणार राष्ट्रीय महामार्ग बंद


नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. गुजरातमधील अनेक भाग भीषण पुराच्या तडाख्यात आहेत. येथील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. दोन बंधारे ओव्हरफ्लो झाल्याने पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. याशिवाय डांग आणि कच्छमध्ये दोन राष्ट्रीय महामार्ग बंद करावे लागले आहेत.

परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत पीएम मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा गुजरातमधील मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी दिली. ते म्हणाले, वायुसेनेच्या दोन हेलिकॉप्टरने आणि एनडीआरएफच्या पथकाने आज सकाळपासून बचावकार्य सुरू केले.

पालघर-पुणे आणि साताऱ्यात ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रातील पालघर, पुणे आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय आज मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत झाला आहे 99 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रात्री उशिरा चार जणांचा मृत्यू झाला. राज्य आपत्ती व्यवस्थापनानुसार, पूर आणि पावसामुळे येथे आतापर्यंत 99 लोकांचा मृत्यू झाला आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF ची 14 आणि SDRF च्या 6 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 7,963 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू – मुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्रात पुरामुळे अनेक लोक अडकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी बारकाईने निरीक्षण करत आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. सर्व डीएम युद्धपातळीवर काम करत आहेत. आमचे सरकार लोकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे.

पाण्याखाली गेला महाराष्ट्र ते तेलंगणा जोडणारा रस्ता
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. चंद्रपूर शहरातील अनेक भागात पुरासारखी परिस्थिती आहे.

गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
गेल्या आठवडाभरापासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे अनेक भाग पुराच्या विळख्यात आले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सूरत, जुनागढ, गीर, भावनगर, तापी, डांग, वलसाड आणि नवसारी या आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. नवसारी आणि वलसाडमध्ये अनेक लोक पुरात अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम येथे तैनात करण्यात आली आहे. याशिवाय डांग आणि कच्छमध्ये मुसळधार पावसामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत.