देश सोडून पळून गेलेले राष्ट्रप्रमुख

देशात झालेला उठाव पाहून सध्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया आपली पत्नी आणि दोन सुरक्षा रक्षकांसह श्रीलंका वायुसेनेच्या विमानाने मालदीव येथे पळून गेल्याची आणि आता तेथून अज्ञान स्थळी जाणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. मात्र देशात बंड होताच किंवा शत्रू कब्जा होताच देश सोडून पळून गेलेले गोटबाया हे काही पहिलेच राष्ट्रपती नाहीत. यापूर्वी किमान १५ देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी देश सोडून पलायन करुन दुसऱ्या देशात आश्रय घेतलेला आहे. त्यातील काहींची माहिती अशी

आपले शेजारी राष्ट्र तिबेटचा ताबा चीनने घेतल्यावर तिबेट सोडून रातोरात जीव वाचविण्यासाठी तेथून निघून भारतात आलेले दलाई लामा आजही भारतात धर्मशाला येथे निवास करत असून तेथून ते तिबेट शासन चालवीत आहेत. इजिप्त मध्ये राजा राज्य करत होता तेव्हा १९५२ साली क्रांती झाली तेव्हा मुहम्मद अली राजवंशाचा शेवटचा उत्तराधिकारी फाऊद दुसरा, देशाबाहेर गेले तेव्हा ते एक वर्षाचे होते. आज ७० वर्षे होऊनही ते अजून देशाबाहेरच आहेत. स्वित्झर्लंड मध्ये त्यांचे वास्तव्य आहे.

झांझिबारचा सुलतान अब्दुल अल सैद हे राजवंशाचे शेवटचे शासक. १९६४ च्या क्रांतीनंतर ते पळून ओमान येथे आणि नंतर ब्रिटन ला गेले आणि तेथेच पत्नी आणि मुलांसह राहत आहेत. आर्जेन्टिनाची पहिली महिला राष्ट्रपती इसाबेल मार्टिनेज १९७४ मध्ये सत्तेवर आली ती पतीचा मृत्यू झाल्यावर. पती राष्ट्रपती पदावर असताना इसाबेल उपराष्ट्रपती होत्या. मात्र लष्कराने त्यांची सत्ता पालटवली तेव्हा त्यांना ५ वर्षे नजरकैदेत काढावी लागली. तेथून कशीबशी सुटका करून घेऊन त्यांनी १९८१ मध्ये पळून जाण्यात यश मिळविले आणि आता त्या स्पेन मध्ये राजकीय आश्रय घेऊन राहिल्या आहेत.

इथिओपियाचे प्रमुख मेंगीत्सु तेली मरियम हे अगोदर सैन्य प्रमुख होते आणि १९७१ ते ९१ ते राष्ट्रप्रमुख बनले. त्यांच्या काळात जनतेवर अनन्वित अत्याचार झाले, लाखोंच्या संखेने लोक मारले गेले तेव्हा १९९१ मध्ये त्यांची सत्ता उलटवून टाकली गेली. त्यांनी झिम्बावे मध्ये राजकीय आश्रय घेतलेला आहे. अफगाणिस्तानचे सुलतान अली केश्मंद १९८१-८८ व १९८९-९० देशाचे प्रमुख होते. पण सत्ता गेल्यावर त्यांनी ब्रिटन मध्ये आश्रय घेतला. अफगाणिस्तानचे मोहम्मद अश्रफ गनी यांनीही तालिबानने देशाचा ताबा घेतल्यावर २०२१ मध्ये देशाबाहेर पलायन करून युएई मध्ये आश्रय घेतला आहे.